बनावट शपथपत्राद्वारे मिळवले फेरीवाला परवाने
#कोथरूड
बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून महापालिकेकडून फेरीवाला परवाने मिळवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी महेश मारणे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कैलास विठ्ठल भिंगारे (वय ५९, रा. रामबाग कॉलनी, पौड रस्ता, कोथरूड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागात २०१४ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास भिंगारे यांनी आर्थिक फायद्यासाठी त्यांचे नातेवाईक हे पुण्यात वास्तव्यास नसताना स्वअधिकारात स्वत:चे नावे असलेल्या शिधापत्रिकेत नातेवाईकांची नावे वाढवली तसेच शिधापत्रिकेत फेरफार केला. ती शासकीय कागदपत्रे खरी असल्याचे भासविले. अर्जदारांचे छायाचित्र न लावता अन्य व्यक्तींचे छायाचित्र लावून बनावट प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याआधारे फेरीवाला नावाने परवाने मिळवले. त्याचा वापर करून आर्थिक फायदा मिळवला. कैलास भिंगारे यांनी लोकांकडून आधारकार्ड तसेच अन्य कागदपत्रे घेऊन फेरीवाले परवाने घेतले. आतापर्यंत त्यांनी चार परवाने मिळवल्याचे उघडकीस आले असल्याचे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.