हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, तिघांवर गुन्हा दाखल
#पुणे
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ एका हाॅटेलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी मयूर प्रकाश माने (वय २७, रा. साई द्वारिका सोसायटी, वडगाव), प्रणीत संजय पोटपिटे (वय २३, रा. दांगट पाटीलनगर, शिवणे), आदर्श अशोक गज्जर (वय ३०, रा. एनडीए रस्ता, उत्तमनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले पुलाजवळ डेक्कन पॅव्हेलियन हाॅटेलच्या इमारतीतील छतावर ॲरो हाॅटेल आहे. या हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू, अन्य साहित्य, असा ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हुक्का पार्लरमधील तीन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.