टांगते ‘हाईट बॅरिअर’
नितीन गांगर्डे
कोरेगाव पार्क येथील सेंट मिराज महाविद्यालयाच्या समोर असलेल्या साधू वासवानी पुलावरून जाण्यास अवजड वाहनांस बंदी आहे. त्यामुळे तेथे ‘हाईट बॅरिअर’ बसवले आहे. मात्र अंधारात असलेल्या या बॅरियरची अवस्था वाईट झालेली आहे.
पुरेसा प्रकाश नसल्याने रात्री अंधारात हे बॅरिअर दिसत नाहीत. त्यावर जड वाहने धडकून अनेकदा अपघात होत आहेत. त्यामुळे ‘हाईट बॅरिअर’च्या दोन्ही बाजूच्या पट्ट्या निखळल्या आहेत. ते खालच्या बाजूस वाकून त्याची उंची कमी झाली असल्याने धोकादायक बनले आहे. नागरिकांनी हा प्रकार अनेकदा महानगरपालिकेच्या लक्षात आणून दिला आहे. मात्र, सुस्त महापालिका याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. शेवटी ही समस्या सोडवण्यासाठी कोरेगाव पार्क येथील वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक वाय. बी. खटके यांनी महापालिकेला पत्र लिहिले आहे. परंतु, ‘हाईट बॅरिअर’चे काम वाहतूक पोलिसांचेच आहे, असे सांगून महापालिकेने टोलवाटोलवी चालवली आहे. दुसरीकडे, कोरेगाव पार्क वाहतूक विभागाने ही जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे सांगत याबाबतची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला पत्र पाठवले आहे.
कोरेगाव पार्क ते नवीन सर्किट हाउस यांना जोडणारा हा साधू वासवानी उड्डाणपूल आहे. कोरेगाव पार्क ते कॅम्प परिसराला जोडणाऱ्या या रस्त्यावर ‘रेल्वे ट्रॅक’ आहेत. या ‘रेल्वे ट्रॅक’वरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी साधू वासवानी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुलाचे आयुर्मान ५० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. त्याची क्षमता नसल्याने येथून अवजड वाहनांस जाण्या-येण्यास बंदी आहे. तो धोकादायक बनल्याने एक वर्षांपासून त्यावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल नेमका कधी आणि कोणी बांधला याची कोणतीही नोंद महापालिकेच्या दप्तरी नाही. हा पूल धोकादायक झाला असल्याने येथून अवजड वाहनास बंदी आहे. त्यामुळे तेथे महापालिकेकडून ‘हाईट बॅरिअर’ लावण्यात आले आहेत.
हा उड्डाणपूल धोकादायक बनल्यानंतर महापालिकेने त्यावर डागडुजी केली. ती केली असली तरी सद्यस्थितीत स्लॅबचे सिमेंट पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुलाच्या खांबांची स्थिती धोकादायक आहे. ‘बेअरिंग पॅड’ची परिस्थिती अत्यंत खराब आहे. त्याचा खांबांवर ताण येऊन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेने काही दिवसांपूर्वी आपल्या अहवालात सांगितले होते.
या पुलावरून अवजड वाहनांस प्रवेश बंदी असल्यामुळे महापालिकेने बसवलेल्या ‘हाईट बॅरिअर’चीही स्थिती धोकादायक आहे. त्याच्या उभ्या खांबाच्या दोन्हीही बाजूच्या आधार असलेल्या पट्ट्या (साईड रिलिंग) निखळल्या आहेत. महापालिकेने येथे पुरेशे दिवे बसवले नसल्याने अंधारात ते दिसून येत नाही. ‘हाईट बॅरिअर’ लक्षात यावे म्हणून त्यावर प्रकाश परावर्तित करणारी लाईटही लावण्यात आली नाही. परिणामी जड वाहने त्याला धडकतात. दोन दिवसांपूर्वीच येथे एक अपघात झाला. नागरिकांनी हा प्रकार ट्विट करून अनेकदा महापालिकेच्या लक्षात आणून दिला. अनेक तक्रारी करून आणि अनेकदा अपघात होऊनही महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे.
याविषयी महापालिकेतील पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांना विचारले असता ‘हाईट बॅरिअर’ लावण्याचे काम पोलिसांचे आहे, असे सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकली. शेवटी कोरेगाव पार्क वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक वाय. बी. खटके यांनी महापालिकेकडे ही समस्या सोडवण्यासाठी अर्ज केला आहे. झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन आता तरी या समस्येचा गांभीर्याने विचार करून ती सोडवतील, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.