Terrorists arrested nearby Pune : दहशतवाद्यांच्या 'हँडलर'ला अटक

दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे आणि टेस्टिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या हॅण्डलरला ११ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. पुणे जिल्ह्याच्या आसपास असणाऱ्या घाटमाथ्यावरील निर्मनुष्य जागेत तसेच घाटरस्त्यावरील दऱ्यांमध्ये बॉम्बचे टेस्टिंग झाल्याचेही नव्याने तपासात समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 3 Aug 2023
  • 11:16 am
दहशतवाद्यांच्या 'हँडलर'ला अटक

दहशतवाद्यांच्या 'हँडलर'ला अटक

घाट रस्त्यांच्या दऱ्या-खोऱ्यांत देत होता बॉम्ब बनवण्याचे आणि टेस्टिंगचे प्रशिक्षण; आतापर्यंत एटीएसकडून ५ जणांना अटक

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे आणि टेस्टिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या हॅण्डलरला ११ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. पुणे जिल्ह्याच्या आसपास असणाऱ्या घाटमाथ्यावरील निर्मनुष्य जागेत तसेच घाटरस्त्यावरील दऱ्यांमध्ये बॉम्बचे टेस्टिंग झाल्याचेही नव्याने तपासात समोर आले आहे.

झुल्फिकार अली बरोडावाला असे राज्य दहशतवाद विरोधी पुणे पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हॅण्डलरचे नाव आहे. ३ जुलैला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली होती. त्यानंतर एटीएसने बरोडावाला याला मुंबई मध्यवर्ती कारागृहातून वर्ग करुन घेऊन दाखल गुन्ह्यात अटक करून पुण्यात आणले आहे.

कोथरूड पोलिसांनी १८ जुलै पहाटे कोथरुड परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी (वय २४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) या दोघांना पकडले आहे. आरोपींना पुण्यात आल्यानंतर आश्रय देणाऱ्या व्यावसायिक अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) याला अटक केली असून, पठाण याला पैसे पुरवले (घर भाडे) म्हणून मेकॅनिकल इंजिनिअर सिमाब नसरुद्दीन काझीला (वय २७, रा. कौसरबाग, कोंढवा, मूळ रा. पंढरी, रत्नागिरी) याला शनिवारी (२९ जुलै) अटक केली होती. दरम्यान, बरोडावाला हा सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या दोघांच्या तसेच पठाणच्या पूर्वीपासून संपर्कात असल्याचे उघड झाल्याने त्याला देखील अटक करण्यात आली आहे.

बरोडावाला हा एनआयए मुंबई कडील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. यापूर्वी पुण्यातून अटक करण्यात आलेला भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकार याचा नातेवाईक असणारा बरोडावाला हा २०१७ ते २०२२ या कालावधीत पुण्यातील कोंढवा भागात राहायला होता. तर डॉ. सरकार याने तरुणांना फितवून दहशतवादाकडे वळविण्याचा आरोप असून, तो आयसिस मध्ये तरुणांना भरती करण्याचे काम करत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोघांना बरोडावाला याने बॉम्ब बनविण्याचे आणि टेस्टिंग करण्याचे ट्रेनिंग दिल्याचे तसेच त्याने पैसे पुरविण्याचे काम केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती एटीएसचे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात दिली. तसेच बरोडावाला हा आत्तापर्यंतच्या तपासातून वरील दहशतवाद्यांचा हँडलर असल्याचे उघड झाले असून, त्याला नेमके कोण ऑपरेट करत होते हे पडताळून पाहण्यासाठी कोठडीची मागणी केली. एटीएसने अटक केलेल्यांची संख्या आता वाढली आहे. तर पुण्यातून फरार झालेल्या मोहम्मद शहनवाज आलम (वय ३१)  याचा शोध एटीएसच्या पथकाकडून केला जात आहे. तसेच फरार झालेल्या आरोपीला आणि गुन्ह्यातील आरोपींना फरार कालावधीमध्ये मदत करणाऱ्यांचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story