उद्योगनगरीत तीन महिन्यांत दोन कोटींचा गुटखा जप्त

राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाल्याची सर्रास विक्री पिंपरी-चिंचवडमध्ये होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यात दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा गुन्हे शाखेच्या विविध शाखा आणि स्थानिक पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून पिंपरी-चिंचवडमधील या बेकायदेशीर गुटखा विक्रीकडे डोळेझाक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 29 Mar 2023
  • 12:52 pm
उद्योगनगरीत तीन महिन्यांत दोन कोटींचा गुटखा जप्त

उद्योगनगरीत तीन महिन्यांत दोन कोटींचा गुटखा जप्त

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाल्याची सर्रास विक्री पिंपरी-चिंचवडमध्ये होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यात दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा गुन्हे शाखेच्या विविध शाखा आणि स्थानिक पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून पिंपरी-चिंचवडमधील या बेकायदेशीर गुटखा विक्रीकडे डोळेझाक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गेल्या तीन महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने या संदर्भात मोठी कारवाई केलेली नाही. शहरात अमली पदार्थ विरोधी पथक हे गुन्हे शाखेअंतर्गत काम करते. या पथकाकडून तीन महिन्यांमध्ये एकदाच कारवाई करून ४४ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे, तर संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक कारवाई करून गुटखा, पानमसाला जप्त करत अनेक आरोपींना अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये विशेष मोहीम राबवत ३३ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई करून १६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, पोलीस ठाण्यांपेक्षा गुन्हे शाखा या कारवाईत आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात १७ आरोपींना अटक करत एक कोटी ९३ हजार रुपयांचा गुटखा पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी जप्त केला. तर त्यानंतर मार्च महिन्यात एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त केला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आतापर्यंत घेतलेल्या मासिक आढावा बैठकीत गुटखा आणि तत्सम अवैध उद्योगांवर कारवाईत सातत्य ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर गुन्हे शाखेकडून कारवाई होत असताना स्थानिक पोलीस ठाण्यांकडून कारवाईत चालढकल चालणार नसल्याचे सांगत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मासिक बैठकीत निरीक्षकांना खडसावले होते. त्यानंतर दोनच दिवसात शहरातून ३३ लाखांचा गुटखा जप्त झाला आहे.

शहरातील बहुतांश पान टपऱ्यांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री केली जात आहे. अगदी महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, सर्व नेत्यांच्या घराजवळ असणाऱ्या पान टपऱ्यांमध्ये गुटखा-पानमसाला उपलब्ध असून, अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीच माहिती कशी नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

समाजमंदिर, शाळा-महाविद्यालय, हॉस्पिटल परिसराच्या नजीक पान टपऱ्या नसाव्यात, असे आदेश असतानाही वरील ठिकाणांजवळ असलेल्या टपऱ्यांमध्ये गुटखा विक्री होत आहे. चिखली, चाकण, रावेत, देहूरोड, तळेगाव दाभाडे, हिंजवडी गावठाण परिसरात सर्वाधिक गुटखा पकडण्यात आला असून, त्यानंतरही गुटखा विक्री मात्र थांबलेली नाही.

दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास, फरार आरोपींची धरपकड, व्हीव्हीआयपी नेत्यांचे बंदोबस्त, कायदा-सुव्यवस्था राखणे ही सर्व कामे करतानाच पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडून कारवाईत सातत्य ठेवले जात आहे, तर केवळ गुटखा आणि अन्य अमली पदार्थ साठा-विक्री करणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी असणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाईत सातत्य राहिलेले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story