शासन नाही दारी, सरकार दिल्ली दरबारी
विजय चव्हाण
जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे गुरुवारी होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत बुधवारी दुपारी मंत्रालयातून अचानक जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यामध्ये कार्यक्रम पुढे ढकलण्याची कारणे स्पष्ट देण्यात आली नसली, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बुधवारी रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकणार नसल्यानेच हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. त्याकरिता दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यामुळे प्रशासनाचे दोन कोटी रुपये पाण्यात गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. या भव्य सोहळ्यासाठी भव्य सभामंडप, लाभार्थ्यांसाठी वितरण व्यवस्था, मान्यवरांसाठी वातानुकूलित कक्ष, विविध उत्पादकांसाठी, बचतगटांसाठी विक्रीचे स्टॉल, लाभार्थ्यांच्या स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा युद्धपातळीवर उभारण्यात येत होता. मात्र अचानक हा कार्यक्रम रहित करण्यात आल्यामुळे प्रशासनाचा म्हणजे जनतेचाच पैसा मातीमोल ठरला आहे. या कार्यकर्मासाठी एकूण २ बकोटी रुपयांचा खर्च झाला असावा, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.
जेजुरीत 'शासन आपल्या दारी' आणि जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जेजुरीतील पालखी तळावर भव्य दिव्य असा सभामंडप टाकण्याचे काम सुरू होते.
साधारणपणे १ लाख ५७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा व सुमारे २१ हजार लोकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात येत होता. गेले आठवडाभर याचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे.
विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यासाठी विद्यमान राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आणला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे हा कार्यक्रम ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देत राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परिणामी ३ जुलैऐवजी ८ जुलै ही तारीख मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ही तारीखही रद्द करत १३ जुलै ही नवी तारीख कार्यक्रमासाठी देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली होती.
नाव न सांगण्याच्या अटीवर जिल्हा प्रशासनातील एक अधिकारी म्हणाले, "पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य मंडप उभारला होता. तसेच जिल्ह्यातील सर्व म्हणजेच १३ तालुक्यांच्या तहसीलदारांना प्रत्येकी दहा हजार नागरिकांना कार्यक्रमस्थळी घेऊन येण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून २५ हजार लाभार्थ्यांना जेजुरी येथे घेऊन जाण्यात येणार होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थिती लावणार होते. मात्र, सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याने या नेत्यांचा अचानक दिल्ली दौरा ठरविण्यात आला."
स्थानिक नागरिक महेश गायकवाड म्हणाले, "रात्री ३ च्या सुमारास या कक्षाच्या मंडपासाठी लोखंडी पिलर उभारून सांगाडा तयार करण्यात आला होता. सांगाडा पूर्ण उभारल्यानंतर कामगार झोपण्यासाठी गेले असता हा संपूर्ण सांगाडा अचानक कोसळला. शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे," असेही ते म्हणाले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जेजुरी येथे आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव
रद्द करण्यात आला आहे. महारोजगार मेळाव्याची पुढील तारीख यथावकाश कळवण्यात येईल. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त एस. बी. मोहिते यांनी सांगितले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.