गेले त्यांच्या वंशा, तेव्हाच कळले...
राजानंद मोरे
बस रॅपिड ट्रान्झिटमधून (बीआरटी) जाताना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस सुसाट जात असल्याचा अनुभव अनेकदा येतो. बसथांब्यावर बस थांबल्यानंतर प्रवासी चढत असतानाच ती पुढे दामटली जाण्याचा प्रकार तर आता पुणेकरांच्या अंगवळणी पडला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी रोजचा खेळ आहे. याचा अनुभव खुद्द पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनादेखील आला. बीआरटी मार्गातील एका बसथांब्यावरून ते बसमध्ये चढत असताना चालकाने अचानक बस पुढे नेली. यामुळे ते पडतापडता वाचले. प्रवाशांच्या जीवाशी चालणारा खेळ लक्षात आल्यानंतर ‘प्रवासी नसले तरी प्रत्येक थांब्यावर किमान पाच सेकंद बस थांबवा,’ असा आदेश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कार्यक्षम आणि शिस्तीचे अधिकारी म्हणून बकोरिया यांची ओळख आहे. त्याचीच प्रचिती पीएमपीमध्येही येत आहे. पीएमपी अध्यक्षपदी रुजू झाल्यापासून त्यांनी प्राधान्याने प्रवासी सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे पीएमपीचा तोटा करण्यावरही भर दिला जात आहे. यासाठी ते प्रत्यक्ष बसने प्रवास करतात. मागील महिन्यातच त्यांनी स्वारगेट ते कात्रज मार्गावर बसने इतर अधिकाऱ्यांसह प्रवास केला होता. एकदा तर त्यांनी पत्नीलाही पीएमपी बसची सैर घडवली. मागील दोन दिवसांत त्यांनी नगर रस्ता बीआरटी आणि संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गाची पाहणी केली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एकूण सात बीआरटी मार्ग आहेत. प्रवाशांचा कोणत्याही अडथळ्यांशिवाय वेगात व सुरक्षित प्रवास व्हावा, हा या मार्गांचा उद्देश आहे. पण प्रवाशांना सध्या विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने बीआरटी मार्गावर येणाऱ्या अडचणी, बसथांब्याची स्थिती जाणून घेण्यासाठी बकोरिया यांनी ही पाहणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरूवारी (दि. २) त्यांनी नगर रस्त्यावर दुपारनंतर बसने प्रवास केला. यादरम्यान बकोरिया यांनी जवळपास प्रत्येक थांब्यावर थांबून पाहणी केली. स्वत: तिकीट काढून त्यांनी बसमधील चालक आणि वाहकांच्या कार्यक्षमतेचीही चाचपणी केली. याचदरम्यान एका बसथांब्यावर थांबले असता बस आल्यानंतर ते चढण्यासाठी पुढे गेले. त्याचवेळी नेमके बसचालकाने बस पुढे नेली. त्यामुळे ते पडता पडता वाचले दरवाजा बंद न करताच बस पुढे नेण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. प्रत्यक्ष बकोरिया यांनाच चालकांच्या सुसाट मनोवृत्ती अनुभव आल्याने तेही अवाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार स्वत: अनुभवल्यानंतर पीएमपी चालकांनी प्रवाशांच्या जीवाशी दररोज चालवलेला खेळ त्यांच्या लक्षात आला. हा जीवघेणा प्रकार थांबवण्यासाठी प्रवासी नसले तरी प्रत्येक थांब्यावर किमान पाच सेकंद बस थांबविण्याचा आदेश बकोरिया यांनी दिला. शिवाय संबंधित चालकाला ताकीद देण्यास त्यांनी सांगितले.
हा अनुभव आल्यानंतर बकोरिया शुक्रवारीदेखील (दि. ३) विश्रांतवाडी मार्गावर पाहणी केली. तसेच सकाळी बीआरटी मार्गांच्या सर्व निरीक्षकांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या.
पान १ वरून
त्यामध्ये प्रत्येक बस प्रत्येक थांब्यावर किमान पाच सेकंद थांबविण्याबाबत सर्व आगार प्रमुखांना कळविण्यात आले आहे. थांब्यावर प्रवासी असो अथवा नसो, बस तिथे थांबवायलाच हवी, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला. प्रवासी बसमध्ये चढून दरवाजा बंद होईपर्यंत बस जागेवरून पुढे नेऊ नये, अशी सूचनादेखील यावेळी देण्यात आली. बीआरटी बसथांब्यांच्या दुरवस्थेवरून बकोरिया यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दुरूस्तीबाबत विनंती केल्याचे समजते.
याविषयी बोलताना बकोरिया म्हणाले, ‘‘बीआरटी मार्गावर प्रवाशांना कोणकोणत्या अडचणी येतात, हे पाहण्यासाठी दोन्ही मार्गांची पाहणी केली आहे. त्याप्रमाणे आढळून आलेल्या त्रुटींनुसार संबंधित विभागांना सुचना दिल्या आहेत. थांब्यांवर खुर्च्या तुटल्या आहेत. इतर सुविधांचीही कमतरता आढळून आली. बसथांब्यावर बस थांबविण्यासह तेथील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. त्याबाबत सुचना देऊन कामे करण्यास सांगितले आहे.’’
दरम्यान, बीआरटी मार्गामध्ये रॅश ड्रायव्हिंग, अचानक ब्रेक दाबणे, बसस्थानकांवर बस न थांबविणे, ओव्हरटेकिंग, बस चालवताना मोबाईल तसेच हेडफोनचा वापर, वाहतुकीचे नियम न पाळणे अशा अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. बस स्थानकावर थांबवताना नेमून दिलेल्या दरवाजावर बस न थांबविता चुकीच्या दरवाजावर थांबविल्याने प्रवाशांची धावपळ होते. याबाबत बीआरटी विभागप्रमुखांकडून अनेकदा आगारप्रमुखांना कळविण्यात आले आहे. त्यानंतरही काही चालकांकडून प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बकोरिया यांना आलेल्या अनुभवावरून स्पष्ट झाले आहे.
बसमधून प्रवास करताना एक वाहक बसूनच तिकीट काढत असल्याचे बकोरिया यांना प्रवासादरम्यान आढळून आले. दरवाजाच्या पुढील बाजूला महिलांच्या आसनावर हा वाहक बसून होता. बकोरिया बसमध्ये चढल्याचेही त्याच्या लक्षात आले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मागील दरवाजाने कोण चढते, कोण उतरते, याची माहितीही त्याला नव्हती. हा प्रकार पाहिल्यानंतर बकोरिया यांनी सर्व वाहकांनी मागील दरवाजाजवळच उभे राहून तिकीटे देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.