जाना था जापान, पहुँच गये चीन

वंदे भारतचा गाजावाजा करत केंद्र सरकार रेल्वेमध्ये आपण कशी सुधारणा घडवून आणली याचा सतत दावा करत असले तरी प्रत्यक्षात इतर रेल्वे गाड्यांच्या स्थितीत तसेच त्यांच्या सेवेत फारसा फरक पडला नसल्याचा अनुभव सतत प्रवाशांना येत आहे. शनिवारी (ता. २५) पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्थानकातून निघालेल्या आझाद हिंद एक्स्प्रेसने पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 11:43 am
जाना था जापान, पहुँच गये चीन

जाना था जापान, पहुँच गये चीन

पुण्याकडे निघालेल्या आझाद हिंद एक्स्प्रेसने कोणाच्या ध्यानी-मनी नसताना नागपुरात दिशा बदलली अन् हैदराबाद गाठले...

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

वंदे भारतचा गाजावाजा करत केंद्र सरकार रेल्वेमध्ये आपण कशी सुधारणा घडवून आणली याचा सतत दावा करत असले तरी प्रत्यक्षात इतर रेल्वे गाड्यांच्या स्थितीत तसेच त्यांच्या सेवेत फारसा फरक पडला नसल्याचा अनुभव सतत  प्रवाशांना येत आहे. शनिवारी (ता. २५) पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्थानकातून निघालेल्या आझाद हिंद एक्स्प्रेसने पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र, प्रवासी झोपेत असतानाच गाडीने मार्ग बदलला अन् दक्षिणेकडील राज्यांतून प्रवास सुरू केला. साखर झोपेतून प्रवासी जेव्हा जागे झाले तेव्हा आपली गाडी कोणत्या मार्गावरून, कोणत्या दिशेने चालली आहे याचा थांगपत्ताच लागत नव्हता. त्यातच गाडीतील जेवण अन् पाणीसाठा संपल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

गेले काही महिने आझाद हिंद एक्स्प्रेसला सातत्याने विलंब होत आहे. प्रवाशांनाही याची थोडीफार कल्पना असते. हावडा स्थानकातून ही गाडी रात्री १० वाजून १० मिनिटांनी निघते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पुण्यात सर्वसाधारणपणे पोहचते. अलीकडच्या काही महिन्यात एकदाही ही गाडी निर्धारित वेळेत किंवा त्याच्या आसपास पोहचलेली नाही. शनिवारी हावडा स्थानकातून ही गाडी वेळेवर निघाली. पुणे गाठेपर्यंत साधारण  तीन-चार तास विलंब होईल, अशी प्रवाशांना अपेक्षा आणि खात्रीही होती. मात्र, झाले भलतेच. ही गाडी सायंकाळी नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर नियमित मार्गाने पुढे जाईल, असे  प्रवाशांना वाटत होते. त्यानुसार गाडी मार्गस्थ झाली. 

रात्रीच्या वेळेत अंधार असल्याने गाडी नेमक्या कोणत्या मार्गाने धावतेय, याची  प्रवाशांना कल्पना येत नव्हती. गाडी ठिकठिकाणी स्थानकांवर थांबत पुढे चालली होती. मात्र, आझाद हिंद एक्स्प्रेसने थेट तेलंगणात प्रवेश केल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली.

हीना अगरवाल या रेल्वे प्रवासी रविवारी मध्य प्रदेशातील दुर्ग रेल्वे स्थानकातून आझाद हिंद  एक्स्प्रेसने पुण्याकडे निघाल्या होत्या. त्या नोकरी करत असलेल्या कंपनीमध्ये सोमवारी सकाळी त्यांना बाणेर येथे  पोहचायचे होते. गाडी वेगळ्याच मार्गाने धावत असल्याने त्यांची तारांबळ उडाली. याबाबत सीविक मिररशी बोलताना त्यांचे पती सचिन सिंग म्हणाले की, नागपूर स्थानक सोडल्यानंतर गाडी वेगळ्याच मार्गाने निघाल्याचे लक्षात आले. दुसऱ्या मार्गावरून गाडी वळविण्यात आल्याचे टीसीने सांगितले, पण याबाबत रेल्वेकडून आम्हाला आधी काहीच कळविण्यात आले नव्हते. साधा मेसेजही नाही. अचानक मार्ग बदलल्याने पत्नीसह इतर प्रवासीही गोंधळून गेले. गाडी पुण्यात कधी पोहचणार हे काहीच सांगितले जात नव्हते. ठिकठिकाणी बराच वेळ गाडी थांबत होती. दुपारपर्यंत गाडीतील जेवण आणि पाणीही संपले होते. सायंकाळपर्यंत त्याची काहीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाल्याची नाराजी सचिन सिंग यांनी व्यक्त केली.

रतिकांत कोळी यांनीही रेल्वेच्या या सेवेबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘सकाळी झोपेतून उठलो,  त्यावेळी गाडी हैद्राबादमध्ये पोहचली होती. प्रत्येक स्थानकावर बराच वेळ गाडी थांबत होती. पुण्यात पोहचायला किती वेळ लागणार, याची काहीच कल्पना दिली जात नव्हती. प्रवासात सर्वांना खूप मनस्ताप झाला. आम्हाला ऑफिस असून वेळेत पोहचायचे आहे, अशी नाराजी कोळी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली. नागपूरहून ही गाडी सिकंदराबाद, हैद्राबाद, वाडी, सोलापूर या मार्गे पुण्यात पोहचणार आहे. रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत गाडी पुण्यात पोहचली नव्हती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे मार्गात सुरू असलेल्या कामामुळे  गाडीला रात्रीचे दहा वाजतील. त्यांच्या म्हणण्यानुसार गाडी पोहचली तरी तब्बल १५ तास विलंबाने ती दाखल होणार आहे.

मार्ग बदलल्याने गाडीचे अंतर आणि वेळही वाढल्याने पॅन्ट्रीमधील गॅसही संपला. परिणामी, प्रवाशांना जेवणही देणे शक्य झाले नाही. गाडीमध्ये जे काही खायला उपलब्ध होते, त्यावरच प्रवाशांना उदरभरण करावे लागले. काही काळ पाणीही संपल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे सचिन सिंग यांनी सांगितले. नागपूरहून सिकंदराबादमार्गे पुण्यापर्यंतचे अंतर जवळपास १२०० किलोमीटर आहे. नागपूरहून पुण्यापर्यंतचे थेट अंतर ९०० किमी आहे. मार्ग वळविल्याने हे अंतर ३०० किलोमीटरने तर वाढलेच पण बराच वेळ ठिकठिकाणी गाडी थांबवावी लागत असल्याने खूप विलंब झाला. या मार्गावरील इतर नियमित गाड्यांना प्राधान्य दिले जात होते.

याविषयी मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रामदास भिसे म्हणाले, मनमाड ते दौंड दरम्यान तांत्रिक काम सुरू असल्याने गाडीचा मार्ग बदलण्यात आला. वाडीमध्ये गाडीतील पाणी भरण्याचे तसेच प्रवाशांना पाणी बाटल्या उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. ही गाडी रात्री दहा वाजेपर्यंत पुण्यात येईल, असा अंदाज आहे. शक्यतो या गाडीचा मार्ग बदलला जात नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story