यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुश्शार!
यशपाल सोनकांबळे
नेहमीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यातील संपूर्ण ९ विभागांतील निकालाचा विचार करता मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.८७ टक्के इतके आहे. मुलांचे प्रमाण त्यापेक्षा ३.८२ टक्क्यांनी कमी म्हणजे ९२.०५ टक्के इतके आहे.
विभागनिहाय विचार करता, पुणे विभागात मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्के इतके आहे. त्या तुलनेत मुलींमध्ये हे प्रमाण ९४.७२ टक्के आहे. याचाच अर्थ, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.८२ टक्के अधिक आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून एकूण १,२८,११७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५९,२०५ मुली आणि ६३,८६६ मुले उत्तीर्ण झाले. पुणे जिल्ह्याचा एकूण निकाल ९६.०६ टक्के लागला. पुणे विभागाने ९५,६४ टक्क्यांसह कोकण आणि कोल्हापूरपाठोपाठ राज्यात तिसरे स्थान मिळवले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, ‘‘ या वर्षी १३,००३ शाळांमधील १५, ७९,३७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६,८४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६१,७०८ने कमी होती. बारावीच्या परीक्षेप्रमाणे दहावीच्या परीक्षेतदेखील मुलींनीच बाजी मारली. मुलांच्या ९२.०५ टक्क्यांच्या तुलनेत ९५.८७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांपेक्षा हे प्रमाण ३.८२ टक्क्यांनी अधिक आहे.’’
विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ४,८९,४५५ इतकी आहे. ५,२६,२१० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ३,३४,०३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यावेळी दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली. यात कोकण विभागाचा (९८.११) निकाल राज्यात सर्वाधिक तर नागपूर विभागाचा (९२.०५) निकाल सर्वांत कमी लागला. ६७ विषयांपैकी २५ विषयांचा निकाल १०० टक्के लागला, ’’ अशी माहितीही शरद गोसावी यांनी दिली.
पैकीच्या पैकी म्हणजे १०० टक्के गुण मिळवणारी डीईएस शाळेची विद्यार्थिनी स्वराली नीतेश राजपूत म्हणाली, ‘‘शाळा सुरू झाल्यापासून मी दररोज दोन ते तीन तास अभ्यास केला. ऑनलाईन निकाल बघितल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्याला १०० टक्के गुण मिळाले, यावर प्रारंभी विश्वासच बसत नव्हता. मग शिक्षक आणि कुटुंबीयांकडून निकाल योग्य असल्याची खात्री करून घेतली. शाळेत पोहोचल्यावर सर्व शिक्षक, कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींनी माझे अभिनंदन केले. माझे आई-वडील आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.’’
आबासाहेब अत्रे रात्रशाळेत शिकून प्रियांका घोडके या विद्यार्थिनीने कौतुकास्पद कामगिरी करताना ७९ टक्के गुण मिळवले. ‘‘मला आई-वडील नाहीत. मी येथे मोठा भाऊ आणि आजीसोबत राहते. मी खडकी मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात काम करीत आहे. माझ्या घरी मी एकमेव कमावती आहे. काम संपवून आल्यानंतर मी रात्रशाळेत जायचे. माझ्या शाळेत मी प्रथम आले आहे. यापुढेही शिकण्याची माझी इच्छा आहे,’’ असे प्रियांकाने ‘सीविक मिरर’ला सांगितले.
दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनीही मारली बाजी
यंदा दहावीच्या परीक्षेत ७,६८८ दिव्यांग, तर २३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या वर्षी आम्ही राज्यात काॅपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वीपणे राबवले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात २.९७ टक्क्यांची घट झाली आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता कला, क्रीडा, चित्रकला, एनसीसी आणि स्काऊट गाईड या क्षेत्रांत मिळून १,७३,५८६ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
दहावीच्या निकालावरही कोविड इफेक्ट
‘‘दोन वर्षे कोविडचा फटका बसल्यामुळे नंतरच्या निकालांवर त्याचा परिणाम जाणवला. २०२१ मध्ये ९९.९५ टक्के निकाल लागला. मागील वर्षी निकाल ९६.९४ टक्के लागला होता. यंदा हे प्रमाण ९३.८३ टक्के इतके आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्के घट झाली. २०२० च्या टक्केवारीचा विचार करता यंदाचा निकाल १.४८ टक्क्यांनी कमी लागला,’’ असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
दहावीच्या निकालातील यंदाची वैशिष्ट्ये
एकूण १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले.
६,८४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
कला, क्रीडा, चित्रकला, एनसीसी आणि स्काऊट गाईडचे अतिरिक्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १,७३,५८६ इतकी आहे.
३३,३०६ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली.
६७ पैकी २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.