कसब्यात गिरीश बापट ‘प्राणवायू’ फुंकणार !

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात चुरशीची लढत होत असून काँग्रेसने भाजपविरुद्ध आव्हान निर्माण केल्याचे दिसत आहे. अशी स्थिती असल्याने भाजप खासदार गिरीश बापट यांनी प्रकृती ठीक नसताना प्रचाराला हजेरी लावली. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. नाकात ऑक्सिजनची नळी असल्याने बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हाताला ऑक्सिमीटर लावला होता. अशा स्थितीतही भाजपच्या प्रचारासाठी ते आले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 17 Feb 2023
  • 01:29 pm
कसब्यात गिरीश बापट ‘प्राणवायू’ फुंकणार !

कसब्यात गिरीश बापट ‘प्राणवायू’ फुंकणार !

श्वास घ्यायला त्रास होत असल्याने ऑक्सिजनसह बापट व्यासपीठावर

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात चुरशीची लढत होत असून काँग्रेसने भाजपविरुद्ध आव्हान निर्माण केल्याचे दिसत आहे. अशी  स्थिती असल्याने भाजप खासदार गिरीश बापट यांनी प्रकृती ठीक नसताना प्रचाराला हजेरी लावली. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. नाकात ऑक्सिजनची नळी असल्याने बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हाताला ऑक्सिमीटर लावला होता. अशा स्थितीतही भाजपच्या प्रचारासाठी ते आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देवून त्यांचं स्वागत करण्यात आलं. एकूणच कसब्यात भाजप प्रचारासाठी प्राणवायू फुंकण्याची जबाबदारी ते पार पाडताना दिसले. 

भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा  होती. मात्र, अखेरच्या क्षणी भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली.

सध्या कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. भाजपचा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे हेमंत रासने यांना  महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर टक्कर देत आहेत. दोन्ही पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांच्याआधी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षे नेतृत्व केलं आहे. तसेच बापट हे पुणे शहराचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे गिरीश बापट यांची कसबा मतदारसंघ आणि पुणे शहरावर मजबूत पकड आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव बापट पोटनिवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले नव्हते. तसे प्रसिद्धीपत्रकही बापट यांनी जाहीर केले होते. बापट यांचे प्रचारातील महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतली होती. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने बापट यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्याचे आणि बापट कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या कामाला लागल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर बापट यांच्या उपस्थितीत केसरीवाड्यात गुरुवारी मेळावा होत आहे. त्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story