Get over it : खिळखिळी बस, आता बस्स!

आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा, रास्त दरातील तिकीट, वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात धावणाऱ्या बस हे सक्षम सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र आपण अजूनही चांगल्या क्षमतेच्या पुरेशा बस देऊ शकलेलो नाहीत याचा प्रत्यय आला. कोथरूडमधील नागरिकांनी अत्यंत खिळखिळी झालेल्या बसचा व्हीडीओ काढून पुणे परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना दाखवला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 22 Apr 2023
  • 05:43 am
खिळखिळी बस, आता बस्स!

खिळखिळी बस, आता बस्स!

पीएमपी अध्यक्षांनी व्हीडीओ पाहून कोथरूड डेपोतील बस बोलावली माघारी

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा, रास्त दरातील तिकीट, वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात धावणाऱ्या बस हे सक्षम सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र आपण अजूनही चांगल्या क्षमतेच्या पुरेशा बस देऊ शकलेलो नाहीत याचा प्रत्यय आला. कोथरूडमधील नागरिकांनी अत्यंत खिळखिळी झालेल्या बसचा व्हीडीओ काढून पुणे परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना दाखवला. त्या बसची अवस्था पाहून त्यांनीही संबंधित बस माघारी बोलावण्याचा आदेश दिला.

सामाजिक कार्यकर्ते सेंथिल अय्यर म्हणाले, ‘‘गुरुवारी आम्ही कोथरूड डेपोतील १२ बसची तपासणी केली. त्यात एक बस अत्यंत खराब अवस्थेत होती. संबंधित बस भंगारात काढण्याच्या योग्यतेची असल्याचे दिसत होते. तरीही या बसला फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे. अशा प्रकारे फिटनेस प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तींविरोधात आम्ही तक्रार दाखल करणार आहोत.’’

‘‘माझ्या घरातील सदस्य पीएमपी बसने नियमित प्रवास करतात. त्यामुळे बसची अवस्था आम्हाला माहिती आहे. कोथरूड बस डेपोमध्ये पाहणी केली असता बसमध्ये प्रवाशांसाठीचे हँडल तुटलेले, सीटचे अँगल सडलेले दिसून आले. प्रवाशांना बसमध्ये चढणे सोयीचे जावे यासाठी दरवाजाजवळ लोखंडी अँगल असतो. हा अँगलही निघण्याच्या बेतात होता,’’ अशी माहिती वनाज मधील रहिवासी अभिजित परदेशी यांनी दिली.

एनआयबीएम रोड येथे वास्तव्यास असलेले विद्यानंद नायक म्हणाले, ‘‘मी पेशाने शिक्षक आहे. खासगी शिकवणीसाठी दररोज बाहेर पडतो. मी नियमित पीएमपी बसने प्रवास करतो. बसथांब्यापासून अस्वच्छतेने सुरुवात होते. धुळीने माखलेल्या बसथांब्यावरून बसमध्ये गेल्यास अंतर्गत अस्वच्छता आपले स्वागत करते. या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. अंतर्गत स्वच्छता नसल्याने कधी धूळ तर कधी ग्रीसही शरीराला आणि कपड्यांना चिकटते. पीएमपी म्हटल्यावर तुटकीफुटकी बस हेच चित्र डोळ्यासमोर येते. ’’

कंत्राटदाराची सांगितलेली बस निघाली पीएमपीची

नागरिकांनी पीएमपी बस खिळखिळी असल्याची तक्रार केल्यानंतर कोथरूड डेपोच्या अधिकाऱ्यांनी ही बस कंत्राटदाराची असल्याची भूमिका घेतली. कंत्राटदाराच्या बस अशाच असतात, असे सांगत प्रशासनाने या स्थितीतून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी तपासणी करीत संबंधित बस पीएमपीचीच असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पीएमपीच्या अधिकाऱ्यांना जबाबदारी घेण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. संबंधित बस १२ वर्षे २ महिने जुनी आहे. तसेच, बसला २५ ऑगस्ट २०२३ पर्यंतचे फिटनेस प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या खिळखिळ्या बसला फिटनेस सर्टिफिकेट कसे दिले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

पीएमपीचे मुख्य अभियंता रमेश चव्हाण म्हणाले, ‘‘बस सोडण्यापूर्वी पत्रा निघालेला नाही ना, गिअर बॉक्स जवळील पत्रा व्यवस्थित आहे की नाही, सीट व्यवस्थित आहे की नाही, गाडी धावण्यास योग्य आहे ना, ब्रेक, क्लच, फर्स्टएड बॉक्स, फायर एस्टिंग्युशर अशा विविध बाबी तपासून गाडी सोडण्यात येते. पीएमपीच्या ताफ्यात ३३७ गाड्या ११ ते १२ वर्षे जुन्या आहेत. तुलनेने गाड्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही जुन्या गाड्या सोडण्यात येत आहेत.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story