पुन्हा गौतमी अन् राडा!
सीविक मिरर ब्यूरो
लावणी डान्सर गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि हाऊसफुल्ल गर्दी हे समीकरण ठरलेले आहे. युवा वर्गाचा उत्साह तर यावेळी इतका ओसंडून वाहत असतो की पोलिसांनाही त्यांना आवरण अशक्य होऊन बसते. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथेही असेच घडले. तिच्या कार्यक्रमात इतका गोंधळ उडाला की, गुंडाळवाडीतील हा कार्यक्रम अर्ध्यावरच गुंडाळावा लागला.
गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रेत गौतमीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम शांततेत सुरु झाला. रिमिक्स गाण्यांवर तरुणाई गौतमीसमोर चांगलीच थिरकली होती. त्यानंतर तरुणांनी एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स सुरु केला. नंतर मात्र तरुणांचा धुडगुस सुरू झाला. यावेळी कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांवर भिडले. अखेर राजगुरुनगर पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र नंतर कार्यक्रम पुढे सुरू ठेवणे शक्य नसल्याने कार्यक्रम संपल्याचे आयोजकांना जाहीर करावे लागले.
रिलस्टार म्हणून प्रसिद्ध झालेल्या गौतमी आणि वाद एक समीकरण बनले आहे. कधी तिने केलेल्या डान्सवरुन वाद निर्माण होतो. कधी तिच्या चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्याच्या वाद येतो. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गोंधळ होतो. गौतमीने तिच्या अदाकारीने सोशल मीडिया आणि तरुणाईवर मोहिनी घातली आहे.
मागील आठवड्यात नगरमध्ये गौतमीची लावणी सुरू असताना काही अतिउत्साही तरुणांनी तिच्यावर नोटांची उधळण केल्याने सुरूवातीला १५ मिनटे कार्यक्रम थांबवावा लागला. गर्दी नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. मात्र तरीही हुल्लडबाजी सुरूच राहिल्याने कार्यक्रम आटोपता घेत मोठ्या बंदोबस्तात गौतमीला तेथून बाहेर काढावे लागले.
बहिरवाडीतल्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील शेकडो तरुण आले होते. त्यामुळं चांगलीच गर्दी झाली होती. गर्दीला आवरणं आयोजकांच्या हाताबाहेर गेलं होतं. महिलांनी हातात काठ्या घेऊनही तरुण काही ऐकत नव्हते. गौतमीच्या अदांवर राज्यातील अनेक तरुण फिदा आहेत. १०-२० किलोमीटरवर कुठंही गौतमीचा कार्यक्रम असला, तर तरुणांची पाऊलं त्या कार्यक्रमाकडे वळतात. गौतमीचा कार्यक्रम आणि तरुणांचा धूडगूस हे आता समीकरणचं झालं आहे.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.