पुण्यात भाईगिरी वाढली
# बोपोडी
तुला भाई बनायचे आहे का, तुझा आज गेमच करतो,’’ असे म्हणत जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर ब्लेडने वार करून दगडाने मारहाण करणार्या दोघांना खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले.
मनीष पडियार (वय २१, रा. भीमज्योतनगर, बोपोडी ) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दिनेश ऊर्फ डीके, अजय ऊर्फ कावू पिल्ले, अभिषेक ऊर्फ सोन्या मोरे, निखील ऊर्फ चंग्या गायकवाड (सर्व रा. बोपोडी ) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मनीष आणि दिनेश याची भांडणे झाली होती. त्याच रागातून आरोपीने बुधवारी (दि. १९) रात्री साडेसातच्या सुमारास इतर साथीदारांना बोपोडीतील आदर्शनगरमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी मनीष परिसरातून जात असताना टोळक्याने त्याला अडविले. ‘‘तुला भाई बनायचे आहे का, तुझा आज गेमच करतो,’’ असे म्हणत त्याच्यावर ब्लेडने वार केले. इतर आरोपींनी मनीषला मारहाण करीत त्याच्या कानावर वार करीत दगड मारला. या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती खडकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे.
पहाटेच्या सुमारास रस्त्याने पायी चालत व्यायाम करणार्या तरुणाच्या हातातील १८ हजारांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. २०) पहाटे पाचच्या सुमारास जंगली महाराज रस्ता परिसरात घडली.
या प्रकरणी समाधान नागरे (वय २६, रा. नवी पेठ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान पहाटे जंगली महाराज रस्त्याने पायी चालत होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. समाधानने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.