गणेशोत्सव २०२३ : पुणे पोलिसांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक
यंदाचा गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून झोन-१ मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पोलीस सह आयुक्त संदिप कर्णीक उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा उत्सव शांततेत आणि निर्विघ्न तसेच उत्साहात पार पडावा म्हणून पुणे पोलिसांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. झोन-१ मधील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशमंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ही बैठक गुरुवारी (दि. १०) सायंकाळी ६ वाजता दुर्वांकुर हॉलमध्ये होणार आहे.
परिमंडळ एकमधील डेक्कन, फरासखाना, खडक, समर्थ, शिवाजीनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गणेशमंडळांची ही बैठक होणार आहे. या बैठकीत मंडळांना गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या अडचणी, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना आवश्यक परवानगी आदी मुद्द्यांवर या वेळी चर्चा होणार आहे.
तसेच गणेशमंडळांनी गणेशोत्सव काळामध्ये घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सुरक्षिततेच्या अनुषंगाने गणपती उत्सवाच्या ठिकाणची सुरक्षा, गणेशोत्सव काळात रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.