रस्त्यावर रात्रीस ‘खेळ’ चाले...

रात्रीच्या वेळी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी होत असल्याने अपघातांची संख्या कमी असेल, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चूक आहात. आरटीओने केलेल्या तुलनात्मक विश्लेषणात पुणे शहरासह जिल्ह्यात दिवसापेक्षा रात्री होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 11 Mar 2023
  • 07:03 am
रस्त्यावर रात्रीस ‘खेळ’ चाले...

रस्त्यावर रात्रीस ‘खेळ’ चाले...

वाहने कमी धावत असूनही पुणे शहरासह जिल्ह्यात रात्री सर्वाधिक अपघात, पहाटेचे प्रमाण लक्षणीय

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

रात्रीच्या वेळी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी होत असल्याने अपघातांची संख्या कमी असेल, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चूक आहात. आरटीओने केलेल्या तुलनात्मक विश्लेषणात पुणे शहरासह जिल्ह्यात दिवसापेक्षा रात्री होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

शहरातील अपघातांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाहनसंख्या वाढत असताना अपघातांचा आकडाही वाढतच चालला आहे. मागील वर्षभरात शहरातील अपघातांमध्ये सुमारे पावणे दोनशेहून अधिक जीवघेणे अपघात झाले आहेत. तर ३२० अपघातांमध्ये गंभीर दुखापत झाली आहे. सर्वाधिक अपघात सायंकाळी सहानंतर झाले आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यावरील वाहनसंख्या अत्यंत कमी असताना म्हणजे पहाटेच्या वेळी अपघातांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.

आरटीओकडून पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार रात्री होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत सर्वाधिक अपघात घडत आहेत. एकूण अपघातांमध्ये दुचाकींच्या अपघाताचे प्रमाण तसेच पादचाऱ्यांशी निगडित अपघातांचे प्रमाण सुमारे ९० टक्के एवढे असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरात जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १७२ जीवघेणे अपघात झाले असून ३२० गंभीर स्वरूपाचे अपघात आहेत. जवळपास ७१ अपघातांमध्ये किरकोळ जखमींना रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागले. तर ५२ अपघातांमध्ये कुणीही जखमी झालेले नाही.

तुलनात्मक अभ्यासानुसार, रात्री ९ ते १२ या वेळेत सर्वाधिक ३१ जीवघेणे अपघात झाले आहेत. तर सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेतील जीवघेण्या अपघातांची संख्या २७ आहे. गंभीर स्वरूपाचे अपघातही याच वेळेत झाले आहेत. हा आकडा जवळपास १०० एवढा आहे. शहरातील रस्त्यांवर प्रामुख्याने सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत वाहनांची संख्या सर्वाधिक असते. प्रामुख्याने रात्री ९ नंतर वाहन संख्या रोडावत जाते. असे असले तरी, मध्यरात्री आणि पहाटेही लक्षणीय अपघात होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

मध्यरात्री १२ ते ३ या वेळेत १९ जीवघेणे अपघात झाले आहेत. तर गंभीर जखमी झालेले अपघात २६ असून इतर किरकोळ अपघात २४ आहेत. पहाटे ३ ते ६ यावेळेतही ९ जीवघेणे अपघात आहेत. यावर्षी जानेवारी महिन्याच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक अपघात हे अतिवेगामुळे झाले आहेत. हा आकडा ७० एवढा आहे, तर ओव्हरटेकिंग आणि रॅश ड्रायव्हिंगमुळेही अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा आकडा अनुक्रमे २९ आणि २५ असा आहे. चालकाने मद्यपान केल्याने ५ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये २७ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक जीवघेणे अपघात दुचाकीस्वारांचे आहेत. १०२ अपघातांमध्ये चालक किंवा सोबतच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर १४३ अपघात गंभीर स्वरूपाचे होते.    

 या तुलनात्मक विश्लेषणाविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील अपघातांचे तालुकानिहाय विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांमध्ये अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यानुसार तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षकांची रस्तासुरक्षा प्रबोधन तसेच वाहन तपासणीसाठी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे अपघातप्रवण क्षेत्रांचे जिओटॅगिंग केले जात आहे. अपघातप्रवण क्षेत्रातील उपाययोजना संबंधित विभागाला कळविण्यात येणार आहे.’’ दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना स्वत: आणि मागील व्यक्तीने हेल्मेट परिधान करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story