गेले कुलकर्णी आणि टिळक, आता बापट?
विजय चव्हाण
vijay.chavan@civicmirror.in
TWEET@VijayCmirror
राज्यात पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यात भाजपला अपेक्षित यश आलं नसल्याचं दिसून आलं. यानंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड या मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले असून त्या विरोधात स्थानिक ब्राह्मण समाजात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे.
हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी सोमवारी (दि. ६) या संदर्भात जाहीरपणे वक्तव्य करून याचा किती फटका बसेल, ते येत्या २-३ तारखेला कळेल, असा गर्भित इशाराच दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या यावर सूचक भाष्य करणारे बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहेत.
पुण्यात लागलेले बॅनर्स नेमके कुणी लावले आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून या बॅनर्सवर लिहिणाऱ्याचं नाव ‘कसब्यातील एक जागरूक मतदार’ असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरी हे बॅनर्स आणि त्यावर मांडण्यात आलेला मुद्दा यामुळे पुण्यात पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे बॅनरवर?
या बॅनरवर पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड आणि आता कसबा या दोन मतदारसंघांमधील भाजपच्या उमेदवारीचा उल्लेख केल्याचं सूचित होत आहे. “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला... आता नंबर बापटांचा का???… समाज कुठवर सहन करणार?” असा प्रश्न या बॅनरवर उपस्थित करण्यात आला आहे.
पुण्यात कोथरूडमध्ये स्थानिक उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत पाटील निवडून आले असले, तरी मेधा कुलकर्णींचं १ लाखांचं मताधिक्य पाटलांसाठी २० हजारांवर आल्याचं दिसून आलं. त्या पाठोपाठ आता कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी भाजपकडून रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यावरून ब्राह्मण समाजात खदखद असल्याची भूमिका आनंद दवे यांनी मांडली आहे.
“ब्राह्मण समाजात खदखद आहे. भाजपचे लोक सोशल मीडियावरही जाहीरपणे लिहीत आहेत की हे कुठेतरी चुकतंय. त्याची नाराजी मतदारसंघात कशी दिसेल, याचं चित्र भाजपच्या लोकांना २-३ तारखेला दिसेल”, असंही आनंद दवे यांनी नमूद केलं आहे.
सध्या खासदार असलेले गिरीश बापट अनेक वर्षे कसब्याचे आमदार होते. ते पुण्याचे खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक यांनी कसब्याचे प्रतिनिधीत्व केले. दरम्यान, खासदारकी ही बापट यांच्यासाठी अखेरची राजकीय संधी असेल, असे पक्षनेतृत्वाने २०१९ मध्ये त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. अनेक वर्षे कसब्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बापट यांची भाजपचा उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत कुठेही चर्चा नव्हती. अशा परिस्थितीत खासदारकीची मुदत संपल्यानंतर कसब्यात आणि पर्यायाने पुण्याच्या राजकारणात बापट यांच्या अस्तित्वाला धक्का लावण्याचा हा प्रयत्न असल्याचे या बॅनर्समधून सूचित करण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.