नापास होण्याच्या भीतीने भावी डॉक्टरची आत्महत्या

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ससून रुग्णालयातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारून आपले आयुष्य संपवले. अभ्यास न झाल्याने मागील काही दिवसांपासून ती परिक्षा देण्यास तयार नव्हती. त्यामुळे सोमवारी तिचे वडीलच तिला परीक्षेसाठी घेऊन आले होते. परीक्षा संपण्याची वाट पाहत असतानाच तिने इमारतीवरून उडी मारल्याची बातमी त्यांना समजली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 30 Mar 2023
  • 11:10 am
नापास होण्याच्या भीतीने भावी डॉक्टरची आत्महत्या

नापास होण्याच्या भीतीने भावी डॉक्टरची आत्महत्या

अभ्यास झाला नसल्याचे सांगत परीक्षेस दिला नकार; प्रात्यक्षिकाच्या दिवशी ससूनच्या तिसऱ्या मजल्यावरून टाकली

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ससून रुग्णालयातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारून आपले आयुष्य संपवले. अभ्यास न झाल्याने मागील काही दिवसांपासून ती परिक्षा देण्यास तयार नव्हती. त्यामुळे सोमवारी तिचे वडीलच तिला परीक्षेसाठी घेऊन आले होते. परीक्षा संपण्याची वाट पाहत असतानाच तिने इमारतीवरून  उडी मारल्याची बातमी त्यांना समजली.

आदिती दलभंजन असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. तिची बायोकेमिस्ट्री या विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा होती. ससून रुग्णालयातील जुन्या अपघात विभागाच्या पहिल्या मजल्यावर या विषयाची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेतच बॅग ठेवून ती तिसऱ्या मजल्यावर गेली. या मजल्यावर एक खिडकी अर्धवट उघडी होती. तिथूनच आदितीने उडी मारली. ती गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला होता. आदितीला तातडीने आपत्कालीन विभागामध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान सर्व तज्ज्ञ डॉक्टरांकडून तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आदिती पुण्यातीलच असून वडील इंजिनिअर आहेत. तर मोठा भाऊही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिक्षेच्या तणावामुळे आदिती मागील काही दिवसांपासून नैराश्यात होती. बुधवारी तिची पहिलीच प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने दोन-तीन दिवसांपासून परीक्षा द्यायची नसल्याचे पालकांना सांगत होती. ती सतत रडतही होती. त्यामुळे पालकांनी तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन समुपदेशनही केले. तिला औषधेही दिली होती. तू परीक्षा दे घाबरू नकोस, नापास झाली तरी चालेल, असे पालक तिला सांगायचे. पण तरीही ती तयार नव्हती.

बुधवारी आदितीचे वडील तिला परीक्षेसाठी महाविद्यालयात घेऊन आले होते. परीक्षा असलेल्या इमारतीत आदितीला सोडून वडील तिला पुन्हा घरी नेण्यासाठी थांबले होते. ते कॅन्टीनमध्ये गेले होते. त्यानंतर काही वेळात त्यांना आदितीने इमारतीवरून उडी मारल्याचे समजले. दरम्यान, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर म्हणाले, आदितीच्या या मानसिकतेबाबत आम्हाला काहीच माहित नव्हते. पालकांनी याविषयी तिचे शिक्षक किंवा आपल्याशी संवाद साधला असता तर काहीतरी मार्ग काढता आला असतो. तिची परीक्षा किंवा अभ्यासाबाबत निर्णय घेता आला असता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story