woman's gang : महिलेच्या टोळीकडून पाच लाखांची फसवणूक

आपण उत्तर प्रदेशचे आमदार आणि मंत्री असल्याची बतावणी करून एका टोळीने पुण्यातील एका मार्बल व्यावसायिकाला पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून त्याची पाच लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तसेच, त्यानंतर कोणाला याबाबत काही सांगितले, तर पिस्तुलाचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकीदेखील व्यावसायिकाला देण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 28 Apr 2023
  • 01:20 am
महिलेच्या टोळीकडून  पाच लाखांची फसवणूक

महिलेच्या टोळीकडून पाच लाखांची फसवणूक

#वानवडी

आपण उत्तर प्रदेशचे आमदार आणि मंत्री असल्याची बतावणी करून एका टोळीने पुण्यातील एका मार्बल व्यावसायिकाला पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून त्याची पाच लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तसेच, त्यानंतर कोणाला याबाबत काही सांगितले, तर पिस्तुलाचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकीदेखील व्यावसायिकाला देण्यात आली आहे.

या प्रकरणी गणेश राजपुरोहित (वय ५४, रा. खराडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रूपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (सर्व रा. निलंगा, जि. लातूर) व अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्या विरुद्ध आर्म अ‍ॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० मार्च ते २० एप्रिल या कालावधीत घडली आहे. सर्व आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

राजपुरोहित हे मार्बल व्यावसायिक आहेत. २६ मार्च रोजी खराडी बायपास येथे चहा पित असताना, त्यांची आरोपी महिला रूपाली हिच्यासोबत ओळख झाली होती. त्या वेळी तिने आपली आमदार, खासदारांशी ओळख असल्याचे सांगून तिप्पट पैसे मिळवून देण्याची योजना सांगितली. तिने आरोपी पांडे हा उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असून, त्याच्यासोबत फिर्यादीचे बोलणे करून दिले. त्याने पाच लाख रुपये दिले, तर ३० लाख रुपये परत मिळतील असे सांगितले. फिर्यादी या प्रलोभनाला बळी पडले. ३० मार्च रोजी ते एसआरपीएफ ग्रुप परमारनगर येथे भेटले.

फिर्यादीला आरोपींनी आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी बनावट नोटा कशा असतात व त्या केमिकलद्वारे कशा तयार केल्या जातात याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून हे कोणाला सांगितले तर ठार मारू अशी धमकी दिली. फिर्यादीने सुरुवातीला चार लाख रुपये त्यांच्या हवाली केले. त्यानंतरदेखील त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. एकूण ५ लाख ३४ हजार रुपये फिर्यादीने दिले. पैसे दिल्यानंतरदेखील तिप्पट पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पांडे, रूपाली यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी संपर्क बंद केला. तसेच वारंवार त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान अपहार आणि आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story