फुकटचे तेल जाणार 'पचायला' जड
विजय चव्हाण
चंदननगर येथील ‘बीआरटी’ मार्गावर मंगळवारी टँकरमधून सांडलेले हजारो लीटर मोहरीचे तेल स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेते आणि हॉटेलच्या कामगारांनी लुटल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवासी, भोजनालये आणि विक्रेत्यांना या अशुदध तेलाचा खाद्यपदार्थांसाठी वापर न करण्याचे आवाहन केले आहे. स्वयंपाक करण्यासाठी किंवा इतर अन्नप्रक्रियेसाठी रस्त्यावर सांडलेले अशुद्ध तेल वापरू नये असे आवाहन करतानातच ते अखाद्य तेल असल्याने त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
बीआरटी मार्गावर मोहरीचे तेल वाहून नेणारा टँकर पलटी झाल्यावर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर सांडलेले तेल घरी नेले होते. स्थानिक लोक बादल्या, डबे आणि भांड्यांमध्ये रस्त्यावर सांडलेले तेल भरत होते. बचाव कर्मचार्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासही लोक तयार नव्हते. त्यामुळे आता संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन एफडीए अधिकाऱ्यांनी हे तेल वापरासाठी असुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे.
'सीविक मिरर'शी बोलताना साहाय्यक आयुक्त अर्जुन भुजबळ म्हणाले, 'आम्ही चंदननगर आणि वाघोली येथे एक टीम पाठवून वस्तुस्थिती तपासण्यास सुरुवात केली आहे. सांडलेले मोहरीचे तेल वापरासाठी असुरक्षित आहे. ते मोहरीचे तेल आहे, ते शुद्ध केल्याशिवाय आहारात वापरणे अयोग्य आहे. हे दूषित तेल स्वयंपाक किंवा तळण्यासाठी वापरू नका. जर कोणतेही भोजनालय किंवा स्थानिक विक्रेते हे मातीमिश्रित तेल वापरत किंवा विकत असतील, तर सजग नागरिकांनी एफडीएशी संपर्क साधावा.आमची टीम वाघोली आणि खराडी परिसरात या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. गरज पडल्यास आम्ही छापेही घालू', असेही भुजबळ म्हणाले.
दरम्यान, या घटनेकडे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने डोळेझाक केली आहे. टॅंकर बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने बीआरटीच्या बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र, चालकाचा वेग जास्त नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, अहमदनगरकडे ३० टन मोहरीचे तेल घेऊन जाणारा एक टँकर मंगळवारी सकाळी चंदननगर चौकात बीआरटी मार्गावर उलटला होता. त्यातून हजारो लिटर तेलाची गळती झाली. त्यानंतर परिसरातील हजारो नागरिकांनी सांडलेले तेल आपल्या घरी नेले. प्रक्रिया न झालेल्या या तेलात रस्त्यावरील विषारी घटक मिसळल्याने ते आरोग्यास अपायकारक ठरणार आहे. मात्र, त्याचा कोणाही विचार न करता हाती मिळेल ते भांडे घेऊन तेलाची लूट करीत येथील नागरिकांनी आपल्याच आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण दिले आहे.
भरधाव टँकर दुभाजकावर गेल्याने रस्त्यावरच उलटला. त्यामुळे दहा तासांहून अधिक काळ या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली. त्याची परिणती मोठी वाहतूक कोंडी होण्यात झाली होती. त्याचवेळी स्थानिक रहिवासी, हातगाडीवाले, हॉटेलचालक टँकरमधून गळणारे मोहरीचे तेल भरून नेण्यात मग्न होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.