ऑनलाईन मोबाईलच्या खोक्यात साबणाच्या वड्या भरून फसवणूक
#कोंढवा
ऑनलाईन मोबाईल मागवल्यानंतर त्याच्या खोक्यात मोबाईलऐवजी साबणाच्या वड्या भरून फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील चोरट्यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. अभिषेक हरिभाऊ कंचार (वय २०, रा. श्रीगणेश छाया बिल्डिंग, दिवा, ठाणे), धीरज दीपक जावळे (वय २१, रा. सिजन सहारा रिजन्सी, नांदिवली, कल्याण, जि. ठाणे), आदर्श ऊर्फ सनी शिवगोंविद चौबे (वय २५, रा. कस्तुरी चाळ, मानपाडा, डोंबिवली, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोंढवा भागातील झॅप एंटरप्रायजेस कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेले मोबाईल संच ग्राहकांना घरपोहोच दिले जातात.आरोपी कंचार, जावळे, चौबे यांनी ऑनलाईन मोबाईल संच मागविले होते. डिलिव्हरी बाॅय मोबाईल संच घेऊन आरोपींकडे गेल्यानंतर आरोपी मोबाईल संचात त्रुटी असल्याचे भासवून परत करायचे.
डिलिव्हरी बाॅयला बोलण्यात गुंतवून आरोपींनी मोबाईलच्या खोक्यात मोबाईल संच न ठेवता त्यात साबणाच्या वड्या भरल्या होत्या. सेनापती बापट रस्ता परिसरात अशा प्रकारचा गुन्हा घडला होता. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खंडणीविरोधी पथकाकडून या घटनेचा तपास सुरू होता.
आरोपी कंचार, जावळे, चौबे यांनी डिलिव्हरी बाॅयची फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर पथकाने तपास करून तिघांना पकडले. साहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक विकास जाधव, मधुकर तुपसौंदर, प्रवीण ढगाळ, सयाजी चव्हाण, रवींद्र फुलपगारे, हेमा ढेबे, नितीन कांबळे आदींनी ही कारवाई केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.