Accident Laborers got burried : विहिरीचा कठडा कोसळून गाडले गेले चार मजूर

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत शेतातील विहिरीचे काम करताना कठडा आणि मुरुम कोसळल्याने चार मजूर गाडले गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री (१ऑगस्ट) घडली. विहिरीत गाडल्या गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) काम सुरू केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 3 Aug 2023
  • 10:49 am
विहिरीचा कठडा कोसळून गाडले गेले चार मजूर

विहिरीचा कठडा कोसळून गाडले गेले चार मजूर

काम करताना कठडा आणि मुरुम कोसळल्याने झाली दुर्घटना

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत शेतातील विहिरीचे काम करताना कठडा आणि मुरुम कोसळल्याने चार मजूर गाडले गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री (१ऑगस्ट) घडली. विहिरीत गाडल्या गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) काम सुरू केले आहे.

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी (वय ३०), परशुराम चव्हाण (वय ३०), मनोज मारुती चव्हाण (वय ४०) अशी मजुरांची नावे आहेत. सणसर परिसरातील म्हसोबावाडीत विजय क्षीरसागर यांची शेतजमीन आहे. मंगळवारी रात्री शेतातील विहिरीचे काम करताना अचानक कठडा ढासळला. मुरुमाखाली चार मजूर गाडले गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सहायक निरीक्षक दिलीप पवार आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील मुरुमाखाली गाडले गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी पोकलेन, जेसीबी यंत्र मागवण्यात आले. त्यानंतर या घटनेची माहिती एनडीआरएफच्या पथकाला कळविण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी विहिरीत गाडले गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी काम सुरू केले असून, विहिरीत गाडले गेलेले चार मजूर इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे विहिरीचे काम करणारे अनेक मजूर राहतात. या ठिकाणी विहिरीचे काम कंत्राटी पद्धतीने घेतले जाते, असे खूप मजूर या गावात आहेत. त्यापैकीच अकरा मजुरांचा एक गट म्हसोबावाडी येथील विजय अंबादास क्षीरसागर यांच्या विहिरीवर काम करत होता.  या ठिकाणी ११ मजूर काम करत होते. केवळ पौर्णिमा असल्यामुळे काल सात जण कामावर नव्हते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story