या दर्शनाचे सापडले, त्या दर्शनाचे काय?

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या दर्शना पवारच्या खुनाचा मारेकरी पटकन सापडला तरी पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या वेशीवर असलेल्या बावधन भागातील दर्शना टोंगारे या अभियंता तरुणीच्या खून प्रकरणाचा मारेकरी तेरा वर्षांनंतरही सापडलेला नाही. या मुळे टोंगारे खून प्रकरणाची जखम पुन्हा ताजी झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sat, 24 Jun 2023
  • 12:26 am
या दर्शनाचे सापडले, त्या दर्शनाचे काय?

या दर्शनाचे सापडले, त्या दर्शनाचे काय?

बावधनमध्ये तेरा वर्षांपूर्वी खून झालेल्या अभियंता दर्शना टोंगारेचा मारेकरी आजही मोकाट, तपास थंडावला

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या दर्शना पवारच्या खुनाचा मारेकरी पटकन सापडला तरी पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या वेशीवर असलेल्या बावधन भागातील दर्शना टोंगारे या अभियंता तरुणीच्या खून प्रकरणाचा मारेकरी तेरा वर्षांनंतरही सापडलेला नाही. या मुळे टोंगारे खून प्रकरणाची जखम पुन्हा ताजी झाली आहे. तेरा वर्षांमध्ये हिंजवडी पोलीस आणि कालांतराने सीआयडीने केलेल्या या प्रकरणाच्या तपासातून महत्त्वाचे काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. 

३० जुलै २०१० च्या रात्री येरवडा भागातील आयबीएम कंपनीतून दर्शना देविदास टोंगारे ही २१ वर्षीय अभियंता तरुणी मित्र अभिजित तारू याच्यासह दुचाकीवरून बावधन खुर्द येथील घरी आली होती. दर्शनाचे घर बावधन रस्त्यावरून काही अंतरावर आत असलेल्या सुवर्णा पार्क सोसायटीत होते. तिला तिच्या मित्राने जेथे सोडले तेथून बावधन पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर होती. मित्राने सोडल्यानंतर दर्शना पायी जाताना तिच्या मागावर असणाऱ्या मारेकऱ्याने तिला गाठले आणि धारदार शस्त्राने भोसकले.

भोसकल्यानंतर विव्हळत दर्शना मदतीची याचना करत रस्त्यावर पडून होती. तितक्यात तेथून निघालेल्या एका दुचाकीस्वाराने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दर्शनाला पाहिले आणि तिला नागरिकांच्या मदतीने तातडीने कोथरूडमधील एका रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलीस देखील तिच्याबरोबर होते.

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्यानंतर तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेत दर्शनाशी बोलण्याचा प्रयत्न करून तिला बेशुद्ध होण्यापासून थांबविले होते. मात्र, उपचार सुरू असताना रात्री अकराच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एकवीस वर्षांच्या संगणक अभियंता तरुणीचा खून झाल्यानंतर पोलीसही हादरून गेले. तिच्या कुटुंबीयांना तर शोक अनावर झाला होता. दर्शनाचे वडील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्राध्यापक होते. तिच्या कुटुंबीयांकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र, पोलिसांना फारशी माहिती मिळू शकली नव्हती. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय तेव्हा नसल्याने हिंजवडी हा भाग पुणे पोलिसांच्या अखत्यारित होता. तेव्हाचे हिंजवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक गणपतराव माडगूळकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तातडीने तपास सुरू केला होता. हिंजवडी पोलीस ठाण्यातील तत्कालीन तपास विभागाचे प्रमुख आणि सध्याचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष काळे यांनी तांत्रिक विश्लेषणासह काही लोकांची धरपकड करण्यास सुरुवात केली होती.

दर्शनाच्या खुनाची बातमी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली होती. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चिला गेला होता. कारण त्यापूर्वी पुणे शहरात संगणक अभियंता नयना पुजारी हिच्यावर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. तसेच चोरीच्या उद्देशाने बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योतीकुमारी या तरुणीचा गहुंजे परिसरात खून झाला होता. या घटनांमुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघाले होते. महिलांसाठी पुणे असुरक्षित अशी टीकेची झोडही उठविण्यात आली होती. त्यामुळे दर्शनाच्या मारेकऱ्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.

दर्शनाच्या काही नातेवाईकांनी तिच्या पालकांच्या नकळत तिची कुंडली तयार करण्यासाठी ज्योतिषाचा सल्ला घेतला होता. त्यांच्या टेस्टमधून तपासकर्त्यांना कारवाई करण्यायोग्य हाती काहीच लागले नव्हते. पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गाच्या जवळ ही घटना घडल्याने त्या दिवशी मुंबई ते कोल्हापूर या दरम्यान प्रवास केलेल्या अनेकांची प्रत्यक्ष भेटून चौकशी करण्यात आली होती. परंतु, त्यातूनही हाती काहीच लागले नव्हते.

एमपीएससी टॉपर दर्शना पवार प्रकरणात तिचा मित्र शेवटी तिच्या बरोबर होता आणि तोच मारेकरी असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून समोर आले. दर्शना टोंगारे हिच्या बरोबरही तिचा मित्र बरोबर होता. मात्र, तो मारेकरी नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले असले तरी मारेकरी कोण हे पोलिसांना शोधता आलेले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story