माजी नगरसेविकेच्या पतीची पीएमपी चालकाला मारहाण

भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने आणि त्यांच्या साथीदारांनी पीएमपी बसचालकाला अपघाताच्या किरकोळ कारणावरून बुधवारी (दि. १५) बेदम मारहाण केली. या घटनेनंतर पीएमपी कमचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Mar 2023
  • 07:55 am
माजी नगरसेविकेच्या पतीची पीएमपी चालकाला मारहाण

माजी नगरसेविकेच्या पतीची पीएमपी चालकाला मारहाण

कारला धडक लागल्यावर डोक्यात घातला दगड

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने आणि त्यांच्या साथीदारांनी पीएमपी  बसचालकाला अपघाताच्या किरकोळ कारणावरून बुधवारी (दि. १५) बेदम मारहाण केली. या घटनेनंतर पीएमपी कमचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कारला धडक बसल्यावर भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले यांनी पीएमपी बसचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. नंतर प्रतिभा ढमाले यांचे पती नितीन ढमाले आणि त्यांच्या तीन साथीदारांनी बसचालक शशांक देशमाने यांना मारहाण केली. ढमाले आणि त्यांच्या साथीदारांनी देशमाने यांच्या डोक्यात दगड घातला. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक देशमाने हे पीएमपी  बसचे चालक असून बुधवारी सकाळी कर्तव्यावर असताना अभिनव कॉलेज चौकात ते चालवित असलेल्या पीएमपी  बसचा कारला धक्का लागून किरकोळ अपघात झाला. या अपघातानंतर किरकोळ वादविवाद झाला. कारमध्ये पुणे महापालिकेच्या माजी नगरसेवक प्रतिभा ढमाले, त्यांचे पती आणि त्यांचे साथीदार बसले होते. अपघात झाल्यानंतर नितीन ढमाले आणि त्यांच्या साथीदारांनी चालक देशमाने यांना मारहाण करत डोक्यात दगड घातला. त्यामुळे देशमाने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ‘‘तुमचे नुकसान भरून देतो,’’ असे सांगितल्यावरही आरोपींकडून देशमाने यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे लोकप्रतिनिधी असा प्रकार करत असतील तर कसे चालेल? असा सवाल उपस्थित होत आहे.

घटनेची पूर्ण माहिती पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्यानंतर त्यांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी फोनद्वारे संवाद साधून दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी केली.  देशमाने यांना ससून हॉस्पिटल येथे दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

‘पीएमपीएमएल’चे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी पोलीस आयुक्तांशी साधलेला संवाद आणि देशमाने यांच्या तक्रारीनुसार प्रतिभा ढमाले, त्यांचे पती नितीन ढमाले आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आल्याची माहिती स्वारगेट पोलिसांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली.

पुण्यात बसचालकाला मारहाण होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीसुद्धा चालकाला मारहाण केल्याचे प्रकार घडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाने थेट बसमध्ये शिरुन चालकाला मारहाण केली होती. पीएमपी चालकाला मारहाणीच्या घटना अनेकदा घडत असल्याने आपल्याला सुरक्षित प्रवास घडवणारे सुरक्षित आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story