शंभर रुपयांसाठी गमावले तब्बल सव्वाचार लाख

वीज बिल भरले नाही म्हणून नागरिकांना मेसेजच येत असतात. एवढेच नव्हे तर वीज तोडण्याची नोटीसही बजावली जाते. अशा बनावट नोटीस पाठवून त्यातील लिंकवर संपर्क करण्यास सांगितले जाते. त्यानंतर काही क्षणातच तुमच्या खात्यातील लाखोंची रकम गायब होते. अशा प्रकारच्या सायबर फ्रॉडला फ्रॉडला महापारेषणमध्ये काम करीत असलेल्या अधिकारी महिलेचा पती देखील बळी पडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Mar 2023
  • 07:45 am
शंभर रुपयांसाठी गमावले तब्बल सव्वाचार लाख

शंभर रुपयांसाठी गमावले तब्बल सव्वाचार लाख

महापारेषणच्या महिला अधिकाऱ्याचे पतीही सायबर फ्रॉडच्या जाळ्यात

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

वीज बिल भरले नाही म्हणून नागरिकांना मेसेजच येत असतात. एवढेच नव्हे तर वीज तोडण्याची नोटीसही बजावली जाते. अशा बनावट नोटीस पाठवून त्यातील लिंकवर संपर्क करण्यास सांगितले जाते. त्यानंतर काही क्षणातच तुमच्या खात्यातील लाखोंची रकम गायब होते. अशा प्रकारच्या सायबर फ्रॉडला फ्रॉडला महापारेषणमध्ये काम करीत असलेल्या अधिकारी महिलेचा पती देखील बळी पडला आहे. त्यांना अवघ्या शंभर रुपयांचे बिल थकीत असल्याचे सांगितले. इतक्या रक्कमसाठी वीज तोडले जाईल या भीतीपोटी त्यांनी नको त्या ॲपवर क्लिक केले. त्यामुळे अवघ्या सहा मिनिटांत ४.२९ लाख रुपये खात्यातून गेले. तासाभराच्या काळात त्याच्या कात्यातून एकूण ४ लाख ४०  हजार उडाले. विशेष म्हणजे पत्नीला आपल्या संयुक्त बँक खात्यातून ही रक्कम जात असल्याचे दिसत होते.   

महावितरणच्या नावे मेसेज करून लुटीचे सत्र सुरू असताना चोरट्यांनी आता नोटिशीचा  वापर करण्यास सुरूवात केली असल्याचे वृत्त सीविक मिररने बुधवारी (दि.१५) प्रसिद्ध केले आहे. केवळ सामान्य नागरीकच नव्हे तर उच्च शिक्षित व्यक्तीही अशा मेसेजला बळी पडत आहे. सायबर पोलिसांनी देखील अशी नोटीस पाठवून फसवण्याचा प्रकार नवीन असल्याचे मान्य केले. अशी प्रकरणे उघड झाल्यानंतर एक व्यावसायिक वीज बिल भरण्याविषयी आलेल्या मेसेजला कसा भुलला हे स्पष्ट करणारे उदाहरण सीविक मिररच्या हाती आले आहे. कोथरूडमधील रहिवासी असलेले हे व्यावसायिक पेशाने इंजिनिअर असून, ते उद्योगांना स्पेशल पर्पज मशिन पुरवतात. विशेष म्हणजे त्यांची पत्नी महापारेषण या वीज वितरण कंपनीत अधिकारी आहे. या पती-पत्नीच्या संयुक्त खात्यावरूनच ही रक्कम चोरट्यांनी पळवून नेली. विशेष म्हणजे पत्नीला मोठ्या प्रमाणावर पैसे कात्यातून जात असल्याचा मेसेज आला होता. पत्नीने पतीला कळवण्यासाठी फोनही केला होता. मात्र, त्याच वेळी पती फोनवर ऑनलाईन चोराशीच  बोलत होता. ही घटना ७ मार्च रोजी घडली असून, या प्रकरणी संबंधितांनी एसबीआय बँक, कोथरूड पोलीस ठाण्यातील सायबर विभाग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रार दिली आहे.

याबाबत कोथरूडच्या वनाज परिसरातील महेश शिंदे (नाव बदलले आहे) म्हणाले की, मला महावितरणच्या कस्टमर केअरकडून फोन आला होता. बोलणारा व्यक्ती हिंदीत बोलत होता. त्याने आमच्याकडे तुमचे बिल अपडेट नसल्याचे दिसत असल्याचे सांगितले. सिक्युरिटी डिपॉझिटचे शंभर रूपये भरणे बाकी आहे. ते न भरल्यास वीज कापली जाईल असे सांगितले होते. इतक्या किरकोळ रक्कमेसाठी वीज जाऊ नये म्हणून मी ते सांगेल तसे करत गेलो. कारण गेल्या तीन महिन्यांत माझ्या जवळच्या दोन जणांचे वीज कनेक्शन बिल भरण्यास उशीर झाला म्हणून कापले होते. हे माझ्या डोक्यात असल्याने मी त्यांनी सांगितलेल्या ॲपवर गेलो. नंतर माझ्या मोबाईलचा ताबा त्यांच्याकडे गेला. मला एक ७ हजार ६०० रुपयांये कापल्याचा मेसेज आला. म्हणून मी त्यांना सांगितले. समोरच्या व्यक्तीने असे होणार नाही. तुमच्या जुन्या व्यवहाराचा मेसेज असेल असे सांगितले. मग मी फोन कट केला. त्यानंतर फोनमधील मेसेज डिलीट झाले होते. 

म्हणून २.९० लाख मिळाले परत...

माझ्या एसबीआय खात्यातून सात मार्चला सायंकाळी ६.६९ मिनिटे ते ७.५ मिनिटे या काळात ४ लाख २९ हजार ६१५ रुपये गेले होते. आमचे संयुक्त बँक खाते असल्याने माझ्या पत्नीला या दरम्यान जयपूरच्या शाखेतून कॉल आला. त्यांनी या व्यवहाराची माहिती सांगितली. पत्नीने व्यवहार ब्लॉक करायला सांगितले. मात्र, ४.४० लाख रुपये बँक खात्यातून गेले होते. एकूण पाच मोठे व्यवहार लागोपाठ झाले होते. पत्नीने काही व्यवहार तातडीने ब्लॉक करायला लावले होते. त्यातील तीन व्यवहारांतील २.९० लाख रुपयांची रक्कम ९ मार्च रोजी आमच्या खात्यात जमा झाली. मात्र, उर्वरीत १.४० लाख रुपयांची रक्कम मिळाली नाही. आम्ही तासाभराच्या आतच बँकेकडे तक्रार दिली. तसेच, आरबीआयकडे देखील घटनेनंतर ७२ तासांच्या आत ऑनलाईन तक्रार दिली. तसेच, पोलिसांतही तक्रार दिली. त्यामुळे काही पैसे वाचले. मी ८ मार्च रोजी पुणे स्टेशन येथील एसबीआय बँकेच्या मुख्यालयात तक्रार दिली होती. त्याच दिवशी अशाच प्रकारच्या फसवणुकीची आमची तिसरी केस असल्याचे समजले. त्यातील आमचीच सर्वाधिक रक्कमेला फसवणूक झाली होती, अशी माहिती महेश शिंदे यांनी दिली.

वीज बिल फ्रॉडला दररोज एक फसतो....

वीज बिल थकीत असल्याचे सांगून वीज तोडण्याचे मेसेज पाठवून लोकांना फसवणाऱ्या टोळीने शहरात धुमाकूळ घातला आहे. जवळपास दररोज एक व्यक्ती याला बळी पडून हजारो ते लाखो रुपये गमावत आहे. गेल्या १४ महिन्यांत वीज बिलाच्या मेसेजला ४७५ नागरिक बळी पडल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story