पाच कोटींचे क्रीडा संकुल पाच वर्षांपासून धुळीत !
नितीन गांगर्डे
वानवडीतील नागरिकांना खेळण्यासाठी सर्व सुविधा एकत्र असाव्या यासाठी बांधलेली विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधिनी पाच वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या प्रबोधिनीसाठी पाच कोटी खर्च करून त्याचे बांधकाम फास्ट ट्रॅकवर म्हणजे केवळ १४ महिन्यांत पूर्ण केले.
वानवडीतील शिवरकर रस्त्याच्या बाजूला विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधिनी आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्याचे बांधकाम फास्ट ट्रॅकवर म्हणजे केवळ १४ महिन्यांत पूर्ण केले. पाच कोटी खर्चाच्या प्रबोधिनीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर २ जानेवारी २०१७ रोजी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. त्याला आता पाच वर्ष झाले तरी अजूनही नागरिकांसाठी प्रबोधिनीचे दरवाजे बंद आहेत. कोटींच्या घरात पैसे खर्च करून संकुल बंद असल्याने नागरिकांच्या पदरी निराशा पडलीय.
वानवडीत जलतरण तलाव,उद्यान, रस्ते यासारख्या पालिकेच्या अनेक नागरी सुविधा आहेत. कमतरता होती ती क्रीडा संकुलाची. इथल्या मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासाठी महानगरपालिकेचे मैदान नव्हते. ही गरज लक्षात घेऊन विलासराव देशमुख क्रीडा संकुलाच्या उभारणीस सुरवात झाली.
प्रशासनाने वेगाने काम करत अवघ्या १४ महिन्यात वास्तूचे बांधकाम पूर्ण केले. त्याचं नियोजनही चांगल केले. येणाऱ्या नागरिकांना वाहनांच्या पार्किंगसाठी इमारतीच्या खालच्या बाजूला सुविधा उपलब्ध करून दिली. टेनिस, बास्केट बॉल खेळण्यासाठी पहिल्या मजल्यावर जागा ठेवण्यात आली. योग, नृत्याच्या क्लाससाठी त्याच्या शेजारीच जागा ठेवण्यात आली. संकुलाच्या वरच्या मजल्यावर जिमसाठी हॉल बनवला गेला. वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांना इथे खेळ, डान्स, योग, जिम करता येईल असं नियोजन केलं होतं. बांधकाम पूर्ण झाल्यावर मोठा समारंभ करत त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.
लोकार्पण झाल्यावर संकुलातील विजेचे थोडंसं काम बाकी आहे असं सांगत ते बंद ठेवलं. आजपर्यंत ते बंदच आहे. संकुलातील विजेचे काम २०१८ सालीच पूर्ण झाले. कोरोना महामारीच्या लाटेत महानगरपालिकेने या इमारतीचा वापरही केला. ही लाट ओसरल्यावर पुन्हा याला टाळे लावण्यात आले.
हे संकुल पाच वर्षांपासून बंद असल्याने त्याची दुरवस्था झालेली पहावयास मिळते. त्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून व्यायामासाठी जे हॉल बांधले होते तेथे धुळीचे थर जमा झालेत. संकुलाच्या आवारात कचरा जमा झालाय. त्याची व्यवस्थित सफाई होत नाही.
ज्या उद्देशाने हे बांधकाम झाले त्याचा नागरिकांना आता काहीही उपयोग होत नाही. टाळे लावण्यासाठी एवढा पैसा ओतून संकुल उभारले का? असा प्रश्न नागरिक निरोशेने विचारत आहेत.
याबाबत अभिजीत शिवरकर म्हणाले की, वानवडीत नागरिकांना खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी जागा नाही. त्यामुळे इथं क्रीडा संकुलाची गरज होती. ते होत असल्याचे समजल्यावर नागरिकांना आनंद झाला. संकुल पूर्ण होण्याची ते आतुरतेने ते वाट पाहत होते. आता काम पूर्ण झाले, तरी नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे एवढी चांगली वास्तू पाच वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे.
महानगरपलिकेने हे संकुल पुढाकार घेऊन चालवायला हवे परंतू त्यांनी कंत्राटी पद्धतीने इतरांना चालवायला दिले आहे. त्यामुळे ते कितपत यशस्वीपणे चालवले जाईल याची शंका आहे.
वानवडीतील सामाजिक कार्यकर्ते दिनेश सामल म्हणतात "या संकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही ते मुद्दाम बंद ठेवले आहे. ज्या वेळी निवडणुका जवळ येतील तेव्हा परत एखादा कार्यक्रम करून संकुल उघडण्यात येईल. निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करून श्रेय घेण्यासाठी आणि मतांच्या राजकारणासाठी नागरिकांचे पाच कोटी खर्च होऊनही लाभ घेता येत नाही.
एकीकडे केंद्र सरकार खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया सारख्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहे. मुलांना खेळाची गोडी लागावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शेकडो कोटींचा खर्च करत आहे. परंतु, दुसरीकडे कोट्यवधी खर्च केलेले क्रीडा संकुल धूळ खात आहे, ही अवस्था खेदजनक आहे.
क्रीडा संकुल बंद का आहे याविषयी महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी हर्षदा शिंदे यांना विचारले असता 'मी माहिती घेऊन तुम्हाला नंतर सांगते' असं त्या म्हणाल्या. नंतर पुन्हा एकदा विचारल्यावर त्यांनी जर तर ची उत्तरे दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.