आधी भाऊ-भावजयीला, मग स्वत:ला मारले
नितीन गांगर्डे
नोकरी घालविल्याचा संशयावरून झोपेत असलेल्या एकाने सख्खा भाऊ आणि वहिनीवर चाकू, डंबेल्स आणि विटांनी खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शिरूरमध्ये घडला आहे. या हल्ल्यात भावजय जागीच ठार झाली; तर भाऊ गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळून जाणारा हल्लेखोरही मोटारीला धडकून मरण पावला. आंबळे (ता. शिरूर) येथे मंगळवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हा थरार घडला. शिरूर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय २५) असे मृत झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात प्रियांका सुनील बेंद्रे (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील बाळासाहेब बेंद्रे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी हे तिघेही उच्चशिक्षित आहेत. बाळासाहेब पोपट बेंद्रे (रा. अंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सीविक मिररशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मृत अनिल बेंद्रे आणि जखमी सुनील बेंद्रे हे सावत्र भाऊ असून, दोघेही पुण्यात नोकरीस होते व तेथेच वास्तव्यास होते. पदवीधर असलेला अनिल हा खासगी कंपनीत नोकरीस होता. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला सुनीलही खासगी कंपनीत नोकरीस होता. दारूचे व्यसन असलेला अनिल हा कुठल्याही एका कंपनीत टिकून काम करीत नसल्याने त्याला गावाकडे आणून शेती करायला द्यावी किंवा
गोपालनाचा व्यवसाय सुरू करून द्यावा, असे सुनील यांनी सांगितल्याने फिर्यादी
बाळासाहेब बेंद्रे यांनी त्याला १५ एप्रिल रोजी गावी आंबळे येथे आणले होते. शेती
करायची व गावी राहायची मानसिकता नसलेला अनिल परत पुण्याला जाण्यासाठी वडिलांकडे पैसे मागत होता व भांडत होता. सावत्र भाऊ सुनील याच्या सांगण्यावरूनच वडिलांनी आपल्याला गावी आणल्याचा राग त्याच्या मनात होता.
सोमवारी (२४ एप्रिल) रात्री सुनील हे पत्नी प्रियांकासह घराच्या टेरेसवर झोपायला गेले; तर अनिल खालच्या खोलीत झोपला. फिर्यादी बाळासाहेब हे झोपले असताना पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना टेरेसवरून आरडाओरडा ऐकू आल्याने ते टेरेसवर गेले. तेव्हा अनिल हा सुनील यांच्यावर डंबेल्सने हल्ला करीत होता.
बाळासाहेब हे मध्ये गेले असता त्याने त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी शेजारीच असलेल्या चुलत भावाला व त्याच्या मुलांना मदतीसाठी हाक मारली. ते सर्व मदतीसाठी धावले असता अनिल दुचाकीवरून पळून गेला. त्यावेळी प्रियांका या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या सर्वांगावर चाकूने भोसकल्याच्या खुणा होत्या. दुचाकीवरून न्हावरेच्या दिशेने जात असताना आंबळेपासून जवळच अनिल बेंद्रे याच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या मोटारीने धडक झाली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ ससून रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.