आधी 'सोय' केली मग बंदी 'लावली'
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
मतदान प्रक्रिया निष्पक्ष व शांततेत पार पडावी, या उद्देशाने कसबा आणि चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रातील मद्यविक्री चार दिवस बंद ठेवण्यात आली. मात्र, कसबा मतदारसंघाला लागून असलेल्या शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट तसेच चिंचवड लगतच्या पिंपरी, भोर-वेल्हा-मुळशी, मावळ या मतदारसंघात मद्यविक्री सुरू राहिल्याने या दोन्ही मतदारसंघात मद्याचा मुबलक पुरवठा झाल्याचे दिसून आले. यावर तोडगा म्हणून पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी मतदानाच्या आदल्या रात्री ते सकाळी सातपर्यंत सर्व प्रकारची हॉटेल, दुकाने, लॉज बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, शेवटच्या रात्री हा निर्णय घेण्यात आल्याने मद्यपींना मद्याची कमतरता भासली नाही. त्यामुळे केवळ एका मतदारसंघातील मद्यविक्री बंद ठेवून प्रशासनाचा उद्देश सफल झाला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी मटण व दारूच्या पार्ट्या सुरू होत्या. दारूच्या नशेत असलेल्या टोळक्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी चार दिवसांमध्ये विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, कसबा आणि चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात २४, २५, २६ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, २४ तारखेलाच या दोन्ही मतदारसंघात अन्य ठिकाणांहून दारू आणली जात होती. तसेच काही कार्यकर्ते शेजारील मतदारसंघात जाऊन पार्ट्या झोडताना दिसले.
विद्यमान आमदारांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली असतानाही प्रचार शिगेला पोहचला होता. त्यातच आरोपांच्या फैरी झडत असताना काही ठिकाणी वादाचे प्रसंगदेखील घडले. दोन्ही पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता. दोन्ही मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाने अन्य राज्यातून फौजफाटा शहर पोलिसांच्या मदतीला पाठविला होता. त्यामुळे किरकोळ वादाचे प्रसंग सोडले तर शनिवारी संध्याकाळी उशिरापर्यंत कोणताही मोठा वादाचा प्रसंग दोन्ही शहरात घडला नाही. चिंचवड मतदारसंघात ज्या तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत आहे त्या तिघांचे स्वतःचे मोठ-मोठे हॉटेल शहरात आहेत. हॉटेल व्यवसायात असलेल्या उमेदवारांचे हे व्यवसाय नातेवाईकांच्या नावावर आहेत. त्यामुळे मतदारसंघात दारू विक्री बंद ठेवून उद्देश सफल झाला का, असाही सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि जवळ बाळगणाऱ्या अनेकांवर मागील महिनाभरात मोठी कारवाई केली आहे. परंतु, त्यानंतरही वादाला तोंड फुटले असल्याने आता सर्वच दुकाने एका रात्रीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.