कात्रज-कोंढव्यात शहरातील पहिला डॉग पार्क
ईश्वरी जेधे
मुंबई आणि हैदराबाद येथील डॉग पार्कच्या धर्तीवर आता पुणे महापालिकेनेही शहरातील पहिलावहिला डॉग पार्क साकारण्याचा निर्णय घेतला असून कात्रज-कोंढवा परिसरातील तीन एकर जागेची त्यासाठी निश्चिती करण्यात आली आहे.
आपल्या लाडक्या श्वानांना बाहेर फिरायला नेताना अनेकदा श्वानप्रेमींना अन्य नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, मात्र इथे बंदिस्त सुरक्षित जागेत त्यांना आपल्या श्वानांना मोकळेपणे खेळायला आणि त्याद्वारे व्यायामाची संधी मिळणार आहे. कात्रज-कोंढवा येथील फ्लायओव्हरच्या खाली अन्य कोणत्याही नागरी योजना नसल्याने ही जागा डॉग पार्कसाठी देण्यात आली आहे.
भवन रचना आणि उद्यान विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी २० जून रोजी या जागेला भेट देऊन डॉग पार्कच्या आराखड्याची निश्चिती केली असून त्या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. या पार्कसाठी अंदाजे १ ते ५ कोटी रुपयांचे बजेट मंजूर होण्याची शक्यता आहे.
पुणे शहराची लोकसंख्या जसजशी वाढत आहे, तशी प्राणीप्रेमी आणि श्वानपालकांचीही संख्या वाढत आहे. मात्र अन्य नागरिकांसाठी जसे बागा, उद्याने आणि ग्राऊंड राखीव ठेवण्यात येतात, तसे संपूर्ण शहरात एकही जागा नाही जिथे श्वानपालक आपल्या श्वानांना मोकळेपणे खेळायला सोडू शकतील. रस्त्यावरून त्यांना फिरवताना अनेक नागरिक तक्रार करतात, तसेच त्यांच्या मल-मूत्राच्या दुर्गंधीचाही प्रश्न निर्माण होतो. यासाठी हे राखीव डॉग पार्क आवश्यकच होते. येथे श्वानांसाठी अनेक खेळ आणि तसेच जलतरण तलावाचीही सोय करण्यात येणार आहे, असे कोंढवा येथील श्वानपालक अनू कुंजीर यांनी सांगितले.
मुंबई आणि हैदराबाद येथील डॉग पार्कसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते आणि त्यातूनच पार्कची देखभाल केली जाते. त्याच धर्तीवर पुणे महापालिकाही पार्कच्या शुल्कातून व्यवस्थापन खर्च भागवणार आहे. आजच्या घडीला पुण्यात सुमारे ८००० अधिकृत नोंदणी केलेले पाळीव श्वान आहेत. ज्यांनी नोंदणी केली नाही अशांची संख्या सुमारे ८० हजार ते एक लाखाच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
पुणे मनपाच्या पशुवैद्यकीय विभागाच्या प्रमुख डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले की, ‘‘या पार्कमध्ये एक पशुवैद्यकीय विभाग तसेच ग्रूमिंग पार्लरदेखील असणार आहे. या दोन्ही सुविधा सशुल्क असतील. या पार्कमध्ये भटकी कुत्री प्रवेश करणार नाहीत, याचीही योग्य ती काळजी घेण्यात येईल. तसेच त्यांच्या नसबंदीची योजनाही सुरू राहील. डॉग पार्कच्या जागेची नीट पाहणी करून मगच त्याची निश्चिती करण्यात आली आहे. अनेकदा अशा मोकळ्या जागेत झोपडपट्ट्या उभ्या राहतात, तसे इथे होऊ नये, अशी आमची इच्छा होती आणि त्या दृष्टीने सर्व पाहणी करण्यात आली आहे.’’
‘‘आम्हाला खात्री आहे की, या डॉग पार्कचे शहरातील श्वानपालकांकडून भरघोस स्वागत होईल आणि याला कुणाचाही विरोध असणार नाही. अनेक घरांमध्ये श्वान हे पाळीव प्राणी नाही तर कुटुंबाचा एक घटक म्हणूनच सांभाळलेले असतात. त्यांच्यासाठी हे पार्क वरदानच ठरणार आहे. ही योजना अपेक्षेनुसार यशस्वी झाली, तर त्या धर्तीवर शहरात अन्य ठिकाणीही अशा पद्धतीचे पार्क उभारण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही डाॅ. फुंडे यांनी आवर्जून नमूद केले.