अखेर पोलिसांना 'मंद प्रकाश' दिसला

‘स्पा’च्या नावाखाली चालणाऱ्या बंद खोलीतील कारभाराकडे पोलिसांचा कानाडोळा होत असून, याबाबत ‘सीविक मिरर’ने ‘स्पाचा मंद प्रकाश पोलिसांना दिसेना’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत सामाजिक सुरक्षा पथक आणि युनिट दोनच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून दोन ठिकाणे छापेमारी केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 14 Mar 2023
  • 11:08 am
अखेर पोलिसांना 'मंद प्रकाश' दिसला

अखेर पोलिसांना 'मंद प्रकाश' दिसला

कस्पटे वस्ती, हिंजवडीतील 'स्पा' सेंटरवर पोलिसांची छापेमारी; ९ पीडितांची केली सुटका

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

‘स्पा’च्या नावाखाली चालणाऱ्या बंद खोलीतील कारभाराकडे पोलिसांचा कानाडोळा होत असून, याबाबत ‘सीविक मिरर’ने ‘स्पाचा मंद प्रकाश पोलिसांना दिसेना’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत सामाजिक सुरक्षा पथक आणि युनिट दोनच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून दोन ठिकाणे छापेमारी केली.

वाकड, कस्पटे वस्ती परिसरातील मानकर चौकात असलेल्या ‘ऐज लाईन वेलनेस स्पा’ आणि हिंजवडीतील ‘जलसा आयुर्वेदिक स्पा’वर छापा मारून ९ पीडित  तरुणींची सुटका करण्यात आली आहे. मात्र, पिंपळे सौदागर, रहाटणी, सांगवीबरोबरीनेच शहरभर पसरलेल्या या उद्योगावर कारवाईत सातत्य नसल्याने या कारभाराबाबत 'ना हाक ना बोंब' अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

व्यावसायिक स्पर्धेतून येऊन एखाद्याने दुसऱ्याबाबत तक्रार करायची आणि त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून कारवाई केल्याचे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची असा काहीसा कारभार सध्या गुन्हे शाखेचा सुरू आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने आत्तापर्यंत केलेल्या बहुतांश कारवाईत बनावट ग्राहक आणि साक्षीदार एकच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विश्रांतवाडी आणि हडपसर येथून बनावट ग्राहक तसेच साक्षीदार बोलावण्यामागील गुन्हे शाखेचे ‘गणित काय’ हे अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासण्याची गरज आहे. पूर्वाश्रमीचे ‘स्पा’ चालक आता सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरात वावरत असून, त्यांच्याकडून व्यावसायिक स्पर्धेतून गुन्हे शाखेला टीप दिली की कारवाई होत असल्याचे चित्र असल्याने यामागील अर्थकारणाचा अंदाज बांधता येऊ शकेल.

 केवळ वाकड परिसरातच स्पाचे स्तोम फोफावले आहे असे नाही. अगदी दिघीपासून ते आळंदीपर्यंत आणि तळेगावपासून बावधनपर्यंत हा व्यवसाय गेल्या आठ-दहा वर्षात वाढीस लागला आहे. पिंपरी-चिंचवड स्वतंत्र आयुक्तालय झाल्यावर याचे प्रमाण शहरात वाढत असतानाच मध्यंतरी याच्यावर टाच आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने तसेच अनेक कारवाईत पुण्यातून आरोपी धरून आणून पिंपरी-चिंचवडमध्ये पकडल्याचे दाखवण्याच्या उद्योगाने हा व्यवसाय बंद होण्यापेक्षा वाढतच गेल्याचे दिसून येते.

दरम्यान, रविवारी वाकडमध्ये झालेल्या कारवाईत एका महिलेला अटक करून किरण मंगेश जाधव (रा. हिंजवडी), मंगेश भगवान जाधव (वय ३५, रा. हिंजवडी), रवींद्र गायकवाड (पूर्ण नाव पत्ता उपलब्ध नाही) आदींवर गुन्हा दाखल करून ४ महिलांची सुटका करण्यात आली आहे, तर हिंजवडीतील कारवाईत सोमनाथ बाबुराव इरबतनवार (वय ३१, रा. हिंजवडी, मूळगाव लातूर) याला अटक करण्यात आली असून, सचिन रतन केदारी (वय २९, रा. कलाटेनगर, वाकड), रोहित मारुती दांडगडे (वय ४२, सध्या रा. वाकड, मूळगाव लातूर) आदींवर गुन्हा दाखल करीत ५ महिलांची सुटका करण्यात आली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी आत्तापर्यंत एमआयडीसी भोसरी, हिंजवडी, वाकड, दिघी या भागातील ४ स्पा तर एक लॉज वर्षभराकरीता सिलबंद केल्याचे पोलिसांनी कळवले आहे. सामाजिक सुरक्षा पथकाचे निरीक्षक देवेंद्र चव्हाण आणि गुन्हे शाखा युनिट दोनचे निरीक्षक जितेंद्र कदम यांनी पथकासह दोन्ही ठिकाणी कारवाई केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story