वृक्षच्छेद; ना खंत ना खेद
विजय चव्हाण
प्रशासनाचे कागदी घोडे, आणि बेगडी पर्यावरणरक्षण कसे असते याचे जिवंत उदाहरण सध्या चिंचवडकर अनुभवत आहेत. एके काळी गर्द झाडी, खळाळता ओढा, मोठ्या प्रमाणात असणारा पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास म्हणून लौकिक असणारा चिंचवडमधील एमआयडीसी कॉलनी परिसर आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काळी शराटी, राखी धनेश, भारद्वाज, टिटवी, ढोकरी व इतर २० पेक्षा जास्त पक्ष्यांचा 'अधिवास' त्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
एका बाजूला ओढ्याची हद्द, दुसऱ्या बाजूला रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या व चौथ्या बाजूला एमआयडीसी कॉलनीची संरक्षक भिंत यामुळे या परिसरात गेल्या ४० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वृक्षसंपदा निर्मित होऊन छोटी "जैवविविधता उद्यान' चिंचवड परिसरात निर्माण झाले होते. त्यामुळे २० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी या परिसरात दिसून येत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून होत असणारी नियोजनबद्ध झाडांची कत्तल, जिवंत झाडे जाळण्याचा अघोरी प्रकार यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा नष्ट होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पर्यावरणप्रेमी व पक्षीप्रेमींनी शनिवारी हा प्रकार उघडकीस आणला. प्रशासनाच्या एकूणच दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचा एक गट या परिसरात नेहमी फेरफटका मारायला गेला असता दर आठवड्याला एक झाड मुळासकट जाळले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. विजय मुनोत, विजय जगताप, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे या स्थानिक रहिवाशांनी तसेच समितीचे अध्यक्ष आणि पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांनी राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे.
या संदर्भात समिती अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील म्हणाले," सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी नेहमी दिसून येणारी काळी शराटी, तिची असणारी तपकिरी बाकदार चोच, माथ्यावर चटकदार लाल रंगाची टोपी, विटकरी लाल रंगाचे पाय, डौलदार चाल आता भविष्यात नजरेस पडणार नाही. राखी धनेश, विविधरंगी चिमण्या, पोपट, बगळे, घार, साळुंकी, टिटवी, ढोकरी, करकोचा, पाणकोंबडी, कोकीळ, पावशा, भारद्वाज, गव्हाणी घुबड, धीवर (खंड्या), बुलबूल, सुगरण, कोतवाल अशा पद्धतीने २० पेक्षा जास्त पक्ष्यांचा अधिवास आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे."
स्थानिक रहिवाशी विजय मुनोत म्हणाले, " एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष, चुकीचे विकास नियोजन आणि नियमबाह्य वृक्षतोड यामुळे बिजलीनगर एमआयडीसी कॉलनी परिसरातील मोठा हरितपट्टा आता गायब झाला आहे. महापालिका प्रशासन व राज्य शासनाच्या उद्योग विभागाला याची साधी कल्पनाही नाही. झाडांची होत असलेली नियोजनबद्ध कत्तल आणि जाळून त्यांची होत असलेली विल्हेवाट याचे
सर्व प्रत्यक्ष पुरावे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेले असून या संदर्भात पोलीस प्रशासनाने तातडीने घटना स्थळाचा पंचनामा करणे अपेक्षित आहे. भारतीय वनसंरक्षण कायदा तसेच महाराष्ट्र वनसंरक्षक कायद्याचे या
प्रकारांमुळे उल्लंघन झालेले असून हा सर्व प्रकार तातडीने थांबविणे आवश्यक आहे. दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली.
या संदर्भात विचारले असता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, "आम्ही पोलिसांची या प्रकरणात मदत घेत असून उपद्रव करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जाईल. गस्त घालण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचाही मंडळाचा विचार आहे."
कितीती झाडे, माहीत नाही...
पिंपरी-चिंचवड महापालिका उद्यान विभागाने हाती घेतलेल्या जीआयएस पद्धतीच्या वृक्षगणनेतून शहरात ३२ लाख वृक्ष असल्याचे दिसून आले आहे. २०११ च्या शेवटच्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची तेव्हा जनगणना १७,२९,३५९ होती. त्या प्रमाणात शहरात लोकसंख्येच्या चार पट म्हणजेच झाडांची संख्या ६९ लाख १७ हजार ४३६ म्हणजेच जवळपास ७० लाख असणे क्रमप्राप्त होते. वृक्षांची परिगणना न केल्यामुळे मनपाच्या हद्दीत किती झाडे अस्तित्वात होती, याची माहिती पालिकेच्या रेकॉर्डवर उपलब्ध नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.