पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीची 'फीडर' बस सेवा
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पुणे आणि पिंपरी-चिंचवडला मेट्रोने जोडल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात आता 'फीडर' बस सुरू करण्यात आली आहे. चक्राकार पद्धतीने दोन मार्गांवर पीएमपीएमएलची बस धावणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा वाहतूक समस्येवर प्रभावी उपाय असल्याने याचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
या सेवेचा शुभारंभ पिंपरी मेट्रो स्थानकापासून गुरुवारी (३ ऑगस्ट) महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंग आणि महा मेट्रोचे व्यवस्थापक आणि संचालक विनोद कुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महापालिकेचे वाहतूक प्रकल्प नियोजन, जनता संपर्क विभागाचे अधिकारी तसेच पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, महा मेट्रोचे मल्टी मॉडेल इंटिग्रेशन कक्षाचे उपमहाव्यवस्थापक मनोज कुमार डॅनियल, संचालन कक्षाचे उपमहाव्यवस्थापक निशांत गायकवाड यांच्यासह महा मेट्रो, महापालिका आणि पीएमपीएमएलचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील सार्वजनिक दळणवळण व्यवस्था एकमेकांशी संलग्न असल्यास नागरिकांना प्रवासासाठी फायदेशीर ठरणार आहे, या हेतूने पीएमपीएमएलने पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी मेट्रो स्टेशन पासून मेट्रोशी संलग्न बस सेवा सुरू केली असून सार्वजनिक दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमपीएमएल सतत प्रयत्नशील राहील, असे मत पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंग यांनी व्यक्त केले.
महामेट्रोच्या मार्गिका क्रमांक -१ करीता पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत पीएमपीएमएल मार्फत फिडर बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली. यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, नुकताच पिंपरी ते पुणे सिविल कोर्ट असा महा मेट्रोचा मार्ग सुरू झाला आहे. कमीत कमी वेळेत सुखकर आणि सुरक्षित प्रवास या माध्यमातून नागरिकांना करता येणार आहे.
प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी पीएमपीएमएलची संलग्न बस सेवा उपयुक्त ठरणार आहे. रिक्षा सायकल आणि पायी चालणे अशा संलग्न वाहतूक पद्धतीचा वापर करून भविष्यात उद्भवणाऱ्या वाहतूक समस्येवर सक्षमपणे पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आज जरी वाहतूक समस्या अधिक नसली तरी सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेचा नागरिकांनी वापर केल्यास खासगी वाहने रस्त्यावर येण्याचे प्रमाण घटेल. पर्यायाने भविष्यातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल. पर्यावरणासाठी देखील ते उपयुक्त ठरणार आहे.
विनोद कुमार अग्रवाल म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमपीएमएल यांनी पुढाकार घेऊन मेट्रोला संलग्न असलेली बस सेवा सुरू केली. सार्वजनिक दळणवळणाचा अधिक वापर होण्याच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असून या सेवेच्या वापरामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच पैशांचीही बचत होणार आहे.
फिडर बसच्या उद्घाटनासाठी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंग हे मेट्रोने प्रवास करत पीसीएमसी मेट्रो स्थानकावर पोहोचले. आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर सचिंद्र प्रताप सिंग, शेखर सिंह आणि विनोद कुमार अग्रवाल यांनी पिंपरी ते घरकुल चिखली या दरम्यान धावणाऱ्या चक्राकार पीएमपीच्या बसला हिरवा झेंडा दाखवून फिडर बसनेच प्रवास केला. पीएमपीएमएलने पिंपरी ते घरकुल चिखली तसेच पिंपरी ते काळेवाडी फाटा अशा दोन मार्गांवर चक्राकार बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मेट्रोशी संलग्न असल्याने शहरांतर्गत भागातील नागरिकांना मेट्रो स्टेशनपर्यंत आणून सोडले जाणार आहे.