साईनाथ बाबर यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
पुण्यातील मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर यांच्या मुलाला त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या महिला सदस्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी साईनाथ बाबर यांच्या पत्नीने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे.
गेल्या काही दिवसांपुचर्वी पुण्यातील राजकीय नेते आणि व्यावसायिकांना खंडणी प्रकरणी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकरणाचा तपास लागतो तोच पुन्हा एकदा एका राजकीय नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर यांना पुण्यातील एनआयबीएम रोडवर असलेल्या त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या एका महिला सदस्याकडून धमकी मिळाल्याचा आरोप आहे. हवा पीर खान असे आरोपी महिलेचे नाव असून तिने बाबर यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर यांचा १६ वर्षांचा मुलगा सोसायटीत खेळत होता. यावेळी संबंधित महिलेने त्याच्याशी गैरवर्तन केले आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मात्र, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती बाबर यांनी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.