फुकट सूप का देतोस; प्रतिस्पर्ध्याचा हॉटेलमालकावर कोयत्याने वार
#खडकी
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका उपहारगृह चालकाने फुकट सूप देण्याची योजना सुरू केली. ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने एका उपहारगृह चालकावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना खडकी भागात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक स्पर्धेतून उपहारगृहाचालकावर हल्ला करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.
मुलायम रामकृपाल पाल (वय २७, रा.दुर्गा माता मंदिराजवळ, मिलिटरी डेअरी फार्म, खडकी) असे जखमी झालेल्या उपहारगृहचालकाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धार्थ भालेराव, दिग्विजय गजरे (दोघे रा. खडकी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाल यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाल यांचे खडकी बाजार परिसरातील चौपाटीजवळ ‘ओ शेठ’ हाॅटेल आहे. त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फुकट सूप योजना सुरू केली. खडकीतील चौपाटी परिसरात आरोपी भालेराव आणि गजरे खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावतात. पाल यांनी ग्राहकांना फुकट सूप देण्यास सुरुवात केल्यानंतर प्रतिसाद वाढला. ग्राहकांच्या प्रतिसाद वाढल्याने पाल यांच्यावर आरोपी चिडून होते. वादातून आरोपी भालेराव आणि गजरे यांनी पाल यांच्यावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून खडकी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.