'फन'डक्टर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचारी नागरिकांशी सौजन्याने अन् सभ्यतेने वागत असल्याचे चित्र तसे दुर्मीळ म्हणता येईल. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना ड्रायव्हर, कंडक्टर किंवा डेपो मॅनेजर ज्या पद्धतीने खेकसतात किंवा दुर्मुखलेल्या चेहऱ्याने संवाद साधतात तो अनुभव पुणेकरांना काही नवीन नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 6 Feb 2023
  • 03:10 pm
'फन'डक्टर

'फन'डक्टर

भोसरी-राजगुरूनगर प्रवासात कंडक्टर ऐकवतो किस्से, कहाण्या आणि भरपूर माहिती, २६ िकमीचा प्रवास होतो रंजक

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचारी नागरिकांशी सौजन्याने अन् सभ्यतेने वागत असल्याचे चित्र तसे दुर्मीळ म्हणता येईल. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना ड्रायव्हर, कंडक्टर किंवा डेपो मॅनेजर ज्या पद्धतीने खेकसतात किंवा दुर्मुखलेल्या चेहऱ्याने संवाद साधतात तो अनुभव पुणेकरांना काही नवीन नाही. सुटे पैसे किंवा अन्य काही कारणांमुळे होणारे वाद पुणेकरांच्या आयुष्यातील नित्याचे म्हणावे लागतील. वाहकाने प्रवाशांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीही अनेक वेळा पाहावयास मिळतात. या अनुभवांना अपवाद ठरणारे एक वाहक आपणाला सध्या राजगुरुनगर ते भोसरी या बसमार्गावर भेटतात. अमित हाडवळे हे त्यांचे नाव. प्रवाशांशी वागण्याच्या आगळ्या-वेगळ्या शैलीने अमित यांनी या मार्गावरील प्रवाशांची मने जिंकून घेतली आहेत. प्रवाशांबरोबरच प्रशासनातील कर्मचारी, सहकारीही त्यांचा कौतुकाने उल्लेख करतात. आपले कर्तव्य पार पाडत असताना अमित आपुलकीने प्रवाशांना विविध मार्गांची, पीएमपीच्या योजनांची माहिती देतात. तसेच खासगी वाहनांनी प्रवास करून जीव धोक्यात घालण्याऐवजी पीएमपीनेच प्रवास करण्याचे आवाहनही ₹ते करतात. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या वागण्यामुळे गेल्या दहा वर्षांत पीएमपीने त्यांना एक-दोनदा नव्हे तर चक्क पाच वेळा गुणवंत कर्मचारी पुरस्कार दिला आहे.

प्रवाशांना पीएमपी योजनांची माहिती देताना किस्से ऐकवण्याबरोबर विविध माहितीचा  खजिनाही उघडा करत असतो. एखाद्यावेळी चालकांने अचानक ब्रेक दाबला तर यम आडवा आली की काय, असा प्रश्न विचारत प्रवाशांना हसवत राहतो. प्रसंगनिष्ठ विनोद, चुटकुले ऐकवताना प्रवाशी खळखळून हसतात आणि गर्दीत धक्के खात होणारा प्रवास सारे जण क्षणभर विसरून जातात. आळेफाटा येथे राहणारे अमित २०१२ मध्ये पीएमपीत वाहक म्हणून रुजू झाले. खरेतर २००८ मध्ये त्यांची निवड झाली होती. प्रतीक्षा यादीमुळे चार वर्ष वाट पाहावी लागली. त्यानंतर मात्र त्यांनी स्वत:ला पीएमपीसाठी झोकून दिले आहे. गेल्या दहा वर्षांत पाच वेळा गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन पीएमपी प्रशासनाने त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांच्या कामाची तऱ्हाच वेगळी आहे. बसमध्ये गर्दी असली की वाहक तिकीट देण्यात व्यस्त असतात. शहरातील मार्ग असेल तर वाहकांना मान वर करायलाही वेळ मिळत नाही. लांब पल्ल्याच्या मार्गावर तुलनेने कमी थांबे असल्याने सतत तिकिटांसाठी तगादा लावावा लागत नाही. अमित हे राजगुरुनगर ते भोसरी बसमार्गावर असतात. सकाळी बसचा प्रवास सुरू झाल्यानंतर तिकीट देण्याबरोबरच अमित यांचे दुसरे पण पीएमपीसाठी तितकेच महत्त्वाचे कामही सुरू होते. तिकीट देत असतानाच ते प्रवाशांना पीएमपीच्या विविध मार्गांवरील बसची माहिती देतात. त्यांचे जवळपास ३० ते ३५ मार्ग तोंडपाठ आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ, महिला, दिव्यांग, विद्यार्थी यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहितीही प्रवाशांना ते देतात. पुण्यदशम सेवेसह पीएमपीच्या इतर सेवांबाबत ते प्रवाशांना अवगत करतात. ही माहिती सांगण्याची त्यांचे एक वेगळेच कौशल्य आहे. त्यामुळे प्रवासीही त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेत कामाचे कौतुकही करतात. 

प्रवासी विठ्ठल सुकाळे यांनाही नुकताच हा सुखद अनुभव आला. त्यांनी सांगितले की, गाडीत प्रवेश केल्यानंतर वाहक प्रवाशांसोबत अतिशय विनम्रपणे सूचना देत, संवाद साधत तिकीट काढत आमच्यापर्यंत आले. माझ्याजवळ सुटे पैसे नव्हते. परंतु कुठलाही नाराजीचा सूर न आळवता त्यांनी तिकीट दिले. प्रवाशांना विविध सूचना ते अत्यंत विनम्रपणे करत होते. राजगुरुनगर ते भोसरी या प्रवासात कमीत कमी २० ते २५ थांबे येतात. येणाऱ्या प्रत्येक थांब्याला अगदी मोठ्या आवाजात स्थानकाच्या वैशिष्ट्यासह पूर्ण नाव घेऊन ते प्रवाशांना माहिती देत होते. एक तासाच्या प्रवासात अंध, अपंग, वृद्ध, महिला व इतर सर्वच प्रवाशांसाठी विविध योजनेची माहिती देतात. तसेच सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व सर्व प्रवाशांना समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. माझ्यासाठी हा अतिशय सुखद अनुभव होता. पुढील प्रवासासाठी कोणाला सुटे पैसे हवे असतील तर घेऊन जा, असे म्हटल्यानंतर मात्र धक्काच बसला. अनेक प्रवाशांनी टाळ्या वाजवून या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वाहकाला दाद दिली. त्यांच्यासारखी प्रामाणिक सेवा इतर कर्मचाऱ्यांनीही केल्यास पीएमपीला त्याचा फायदाच होईल, असा अनुभव सुकाळे यांनी सांगितला. अमित यांच्या या विनम्र सेवेबद्दल पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे यांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, अमित हाडवळे हे स्वयंप्रेरणेने हे काम करत असून ते कौतुकास्पद आहे. गुणवंत कर्मचारी म्हणून त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कामामुळे पीएमपीला निश्चितपणे फायदा होत असून प्रवाशांनाही चांगली सेवा मिळत आहे. इतर वाहकही प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात, पण हाडवळे यांचीआगळीवेगळी पध्दत प्रवाशांना भावत आहे. त्याबद्दल पीएमपीकडून त्यांचे नक्कीच कौतुक करण्यात येईल.

प्रवाशांना तिकीट देणे हे तर माझे नियमित काम आहेच, पण प्रवाशांना इतर बसमार्गांची, योजनांची माहिती देणे, त्यांना पीएमपी प्रवासासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मी प्रयत्न करतो. त्यांच्या प्रत्येक अडचणीचे समाधान झाल्यानंतर माझ्या मनाचेही समाधान होते. एखाद्या दिवशी वेगळा मार्ग मिळाला तर त्या मार्गातील थांबे, इतर बसमार्ग, बस क्रमांक आदी सर्व माहिती आदल्या दिवशीच घेऊन त्याचे टिपण तयार करतो. त्यानुसार मग दुसऱ्या दिवशी मार्गावर प्रवाशांशी संवाद साधतो. हे काम माझ्या आवडीचे असून प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद हीच पाठीवरील कौतुकाची थाप समजतो.

- अमित हाडवळे, वाहक, पीएमपी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story