‘विश्वास’ ने गमावला ‘विश्वास’!
ख्रिश्चन समाजात मानाचे स्थान असलेल्या ख्राईस्ट चर्चचे माजी सचिव चित्तरंजन भास्कर पोळ यांच्या विरोधात ‘मराठी विश्वास' या साप्ताहिकाचे संपादक जॉन गजभिव यांनी बिनबुडाचे, खोटे आरोप तसेच बदनामी केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी संबंधितांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसेच यासंबंधी कारवाई करून त्याचा अहवाल (ॲक्शन टेकन रिपोर्ट) सादर करण्याचा आदेश केंद्र, राज्य सरकारला दिला आहे.
ख्राईस्ट चर्चच्या मे २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत चित्तरंजन पोळ हे विश्वस्तपदी निवडून आले. त्यांची एप्रिल २०१९ मध्ये एक वर्षासाठी सचिव म्हणून निवड झाली. पोळ हे केंद्राच्या महसूल सेवेतून साहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झाले. ख्रिश्चन समाजातील घडामोडींचा आढावा घेणाऱ्या साप्ताहिक ‘मराठी विश्वास' ने १८ सप्टेंबर २०१९ च्या अंकात ‘ख्राईस्ट चर्चमधील गायब झालेल्या दोन हजाराच्या नोटेचा किस्सा' या शीर्षकाची बातमी प्रसिद्ध केली. भक्तांच्या दान रकमेची पोळ आणि अन्य विश्वस्त मोजणी करताना दोन हजाराची नोट गायब झाल्याची कथित बातमी प्रसिद्ध केली आणि त्यास पोळ जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्याकडे बोट दाखवले होते. समाजात त्यांची बदनामी झाली आणि मुदतीपूर्वी त्यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी ‘मराठी विश्वास' ने छापलेल्या ‘अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एल्डरला फटकारले' या बातमीतील सारा रोख पोळविरोधातच होता. तसेच १६ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ‘चित्तरंजन पोळ यांचे २०१९ मधील ते ढोंग होते का?' या शीर्षकाखाली ‘मर्मभेद' सदरात पोळ यांना उद्देशून बदनामीकारक लेखन प्रसिद्ध केले होते.
या लेखनाविरोधात पोळ यांनी ३० ऑक्टोबर २०१९ रोजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे फिर्याद दाखल केली. या तक्रारीची सुनावणी झाल्यानंतर ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ ने नुकताच निकाल देताना आरोपीवर कडक शब्दात ताशेरे ओढले. तसेच यासंबंधी कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश केंद्र, राज्य सरकारला दिला आहे.