फेब्रुवारी-मार्चमध्ये तीन ड्राय डे
सीविक मिरर ब्यूरो
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमुळे फेब्रुवारीत दोन आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक कोरडा दिवस (ड्राय डे) जाणार आहे. मतदानापूर्वी दोन दिवस आणि मतमोजणीच्या दिवशी किरकोळ मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मतदानाच्या दिवशी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी मतदान संपेपर्यंत ड्राय डे असेल. तर, २ मार्च २०२३ रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदारसंघ क्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी निर्देशित कालावधीत व मतदारसंघात सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीत ड्राय डे
लागू असलेल्या क्षेत्रातील परवानाधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. बंद कालावधीत मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासह संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.