मेट्रोच्या साहित्यचोरीचा प्रकार उघडकीस
सीविक मिरर ब्यूरो
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेसाठी वापरण्यात येणारे लाेखंडी बांधकाम साहित्य चोरणाऱ्या टोळीतील एकला चतु:शृंगी पोलिसांनी गजाआड केले.
मेट्रोचे बांधकाम साहित्य चोरीप्रकरणात आणखी काही चोरटे सामील असून त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दीपक पांडुरंग इदवे (वय २८, रा. पिंपरी, मोरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत दिनेश प्रधान (वय २२, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रधान हा मेट्रोमध्ये सुरक्षारक्षक आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. याच्या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर असते. रिक्षातून इदवे आणि साथीदार आले. इदवे आणि साथीदारांनी बाणेर परिसरातून २०० किलो वजनाचे लोखंडी पाईप चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी प्रधानने सहकाऱ्यांच्या मदतीने इदवेला पकडले. त्याच्या बरोबर असलेली एक महिला आणि साथीदार पसार झाले. इदवेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. सहायक पोलीस फौजदार राहीगुडे तपास करत आहेत.
या आधीही पुण्यातील बंडगार्डन परिसरातून मेट्रोच्या साहित्याच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी कंटेनरमधून अज्ञात चोरट्याने एक लाख ४२ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अगमपाल सुरजित सिंग धूपर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती .
बंडगार्डन मेट्रो स्टेशन या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी कंटेनर स्टोअरचे लॉक तोडून दहा इलेक्ट्रिक वायरचे बंडल, एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे १६ लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, तांब्याचे पाईप्स, कटर मशीन, ड्रिल मशीन असा
एकूण एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.