पालिकेच्या खोदकामाचा वीजवाहिन्यांना फटका

सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या वारंवार तोडल्या जात असल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वारजे परिसरातील विविध भागात खंडित वीजपुरवठ्याचा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महावितरणचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Mar 2023
  • 07:52 am
PuneMirror

पालिकेच्या खोदकामाचा वीजवाहिन्यांना फटका

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या वारंवार तोडल्या जात असल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वारजे परिसरातील विविध भागात खंडित वीजपुरवठ्याचा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महावितरणचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान महावितरणने यासंदर्भात पुणे महानगरपालिकेच्या मल नि:सारण देखभाल व दुरुस्ती विभागाला लेखी पत्र दिल्यानंतर वारजे येथील खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणाची नुकतीच संयुक्त पाहणी झाली. यापुढे खोदकाम करताना वीजवाहिन्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे ठरवण्यात आले तसेच वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च महावितरणला देण्याचा आदेश संबंधित कंत्राटदाराला पालिकेकडून देण्यात आला आहे.  

याबाबत माहिती अशी की, सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून जेसीबीद्वारे वारजे परिसरात खोदकाम सुरू आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना कोणतीही पूर्वकल्पना न देता खोदकाम सुरु केले. यामध्ये गेल्या १ ते ८ मार्च दरम्यान वारजे ब्रीज, खान वस्ती, वारजे वाहतूक पोलीस चौकी, रामनगर तसेच वारजे पाणीपुरवठा याठिकाणी २२ केव्हीच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या होत्या. परिणामी पुणे मेट्रो, डहाणूकर कॉलनी, प्रथमेश सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, डुक्करखिंड परिसर, खान वस्ती, हिंदुस्थान बेकरी, रामनगर आदी परिसरातील काही भागात ३ ते ४ हजार वीजग्राहकांना सरासरी १ ते २ तासांपर्यंत खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला तर उर्वरित ठिकाणी महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुवरठा सुरळीत ठेवण्यात आला होता.

खोदकामात जेसीबीने भूमिगत वीजवाहिन्या तोडल्यानंतर त्याची जबाबदारी घेण्यास कंत्राटदाराने नकार दिल्यानंतर महावितरणकडून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ लेखी स्वरुपात कळवण्यात आले. तसेच वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. यानंतर महावितरण व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खोदकामाच्या ठिकाणी संयुक्त पाहणी केली. यापुढे खोदकामात भूमिगत वीजवाहिन्यांचे कसलेही नुकसान होणार नाही याबाबतची खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महावितरणच्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्याचा आदेश संबंधित ठेकेदारास महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story