‘उभरत्या’ गुन्हेगारांवरही आता पोलिसी नजर
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
गुन्हेगारीच्या वाढत्या उदात्तीकरणामुळे आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘उभरत्या गुन्हेगारां’ वरदेखील लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही, पण ज्यांची मानसिकता गुन्हेगारीची आहे अशांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आल्यानंतर गेल्या पाच वर्षांमध्ये शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असणाऱ्यांची एक यादी तयार करण्यात आली होती. तेव्हा शहरातील १,५१३ आरोपींची माहिती समोर आली होती. शहरातील पूर्वीच्या रेकॉर्डनुसार संघटित टोळ्यांची संपूर्ण माहिती पोलिसांकडे तयार आहे. परंतु, त्यातील बहुतांश मरण पावले आहेत. तसेच अनेकांचे केवळ रेकॉर्ड असून, मागील सहा-सात वर्षांत त्यांचा कोणत्याही गुन्हेगारी घटनांशी संबंध राहिला नसल्याचीही पोलिसांच्या दफ्तरी नोंद आहे.
एकीकडे या सगळ्या गोष्टी असतानाच शहरात घडणाऱ्या बऱ्याच गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून येत आहे. त्याचबरोबर पूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड नसलेल्यांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभाग उघड झाला आहे. शहरात एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याच्या तपासावेळी गेल्या काही दिवसांपासून भलत्याच लोकांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे आता गुन्हेगारी मानसिकता असणारे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या सानिध्यात असणारे, गुन्हेगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे अशांची यादी तयार करण्याचे आदेश अतिवरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, रेकॉर्ड नसणारे परंतु, गुन्हेगारीकडे झुकलेल्यांचा आकडा साडेसात हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
गुन्हेगारांचे उदात्तीकरण होत गेल्याने पोलिसांनी त्यावर एक उपाय म्हणून गुन्हेगारांना त्यांच्या भागातूनच चालत नेण्याची कृती केली. या ‘वरात पॅटर्न’ चा मध्यंतरी चांगला परिणाम दिसून आला होता. पोलिसांकडून अशा पद्धतीने वरात काढली जात असल्याने काहीअंशी टवाळखोरीला आळा बसला आहे. दुसरीकडे, इन्स्टाग्राम, फेसबुकवर भाईगिरी करणाऱ्यांचे पेव फुटले असल्याने त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच उभरत्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्यांना पोलिसी भाषेत समज देण्याचे काम सुरू झाले आहे.
माझा गुन्हा पाठीशी घालणारे आहेत. मला गुन्ह्यात मदत करणारे आहेत. मला गुन्ह्यातून बाहेर काढणारे आहेत, अशा फुशारक्या मारणाऱ्या सराईतांमुळे उभरत्या गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. आता त्या उभरत्यांची कुंडली बनविण्याचे काम पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.