संपातही पाडव्याचा गोडवा कायम

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी राज्यव्यापी संपावर गेले असून त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारीही सामील झाले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याला होणारी मुहूर्तावरील वाहनांची खरेदी या वेळी होणार की नाही याबद्दल अनेकांच्या मनात धाकधूक होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 20 Mar 2023
  • 11:43 am
संपातही पाडव्याचा गोडवा कायम

संपातही पाडव्याचा गोडवा कायम

कर्मचारी संपावर असले तरी वाहन नोंदणीसाठी आरटीओने केली पर्यायी व्यवस्था

अनुश्री भोवरे

anushree.bhoware@punemirror.com

TWEET@Anu_bhoware

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी राज्यव्यापी संपावर गेले असून त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारीही सामील झाले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याला होणारी मुहूर्तावरील वाहनांची खरेदी या वेळी होणार की नाही याबद्दल अनेकांच्या मनात धाकधूक होती. मात्र, संप असला तरी  गुढीपाडव्याला  मुहूर्तावरील वाहनांची नोंदणी करण्याची सोय आरटीओ कार्यालयाने केली आहे. यामुळे मुहूर्तावरील वाहन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.   

हिंदूंच्या नव्या वर्षाला चैत्रातील गुढीपाडव्याने सुरुवात होते. गुढीपाडवा हा नव्या वर्षाचा पहिला दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होतो. नवी खरेदी करण्यासाठी प्रामुख्याने वाहन खरेदीसाठी  गुढीपाडवा हा शुभ दिवस असल्याचे महाराष्ट्रात मानले जाते. या दिवशी खरेदी केली तर शुभ काळ आणि भरभराट घरी-दारी येते असे मानले जाते. काहीजण घर खरेदीची पावलेही टाकतात. या दिवशी केलेली खरेदी किंवा टाकलेले नवे पाऊल घरी सुख-समृद्दी घेऊन येते असे मानले जाते. त्यामुळे अनेकजण चार चाकी किंवा दुचाकी खरेदी करण्याचे स्वप्न वास्तवात आणतात. नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि नव्या आर्थिक नियोजनाचाही पहिला दिवस हा गुढीपाडवा असल्याने त्या दिवशी नवी गुंतवणूक, किंवा मोठी खरेदी करण्याचे नियोजन घरोघरी केले जाते. वाहने आणि पुणे शहराचे मोठे अतूट नाते असल्याने या दिवशी शहरात मोठी वाहन खरेदी होते. प्रामख्याने वाहन खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात आरटीओचे कर्मचारी सहभागी असले तरीही गुढीपाडव्याला पुणेकर आपल्या नव्या वाहनांची नोंदणी सहजपणे, विनाअडथळा करू शकणार आहेत. बेमुदत संपामुळे नव्या वाहनाच्या नोंदणीच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, वाहन नोंदणीचे काम नेहमीप्रमाणे सुरळीतपणे पार पाडले जाईल, असे आश्वासन आरटीओ कार्यालयाने दिले आहे. गेल्या सहा दिवसांपासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारने जुन्या पेन्शनच्या मागणीवर ठोस भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांना आश्वस्त करावे अशी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. जुन्या पेन्शनबरोबर अन्य काही प्रलंबित मागण्या  संपकरी कर्मचाऱ्यांच्या आहेत. गेल्या वर्षी गुढीपाडव्याला आरटीओ कार्यालयात सहा हजार नव्या वाहनांची नोंदणी झालेली होती. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर झालेली वाहनांची ही विक्रमी नोंदणी होती. नोंदणी झालेल्या वाहनांपैकी दोन हजार वाहने ही इलेक्ट्रिक वाहने होती. पुणे प्रादेशिक परिवहन  कार्यालयाचे अधिकारी अजित शिंदे याबाबत म्हणाले की, आरटीओ कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले असले तरी ज्यांना मुहूर्तावर वाहनांची नोंदणी करायची आहे, त्यांना वाहनांची नोंदणी करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज असून ज्यांच्याकडे पूर्ण कागदपत्रे आहेत त्यांच्या वाहनांची नोंदणी तातडीने केली जाईल. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे किंवा ज्यांच्याकडे अपुरी कागदपत्रे आहेत त्यांना काही अडचण येऊ शकते. मात्र, त्यांच्या अडचणीवर तोडगा काढण्याचा किंवा मार्ग काढण्याचा प्रयत्न आरटीओ अधिकारी गुढीपाडव्याच्या दिवशी करतील. आरटीओने वाहन विक्रेत्यांना त्यांच्या पातळीवर वाहनांची नोंदणी करण्याचे अधिकार तूर्तास दिले आहेत. त्यामुळे वाहन नोंदणीचे ९० टक्के काम सहजपणे होऊ शकेल. मात्र, जर काही अडचण आली तर नागरिकांच्या सेवेसाठी आरटीओ अधिकारी तत्पर आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story