Evacuation orders from Lavasa area : लवासा परिसरातून स्थलांतराचे आदेश

मुळशी तालुक्याच्या लवासा परिसरात दरडीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना म्हणून तेथील कुटुंबांना अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी लेखी सूचना दिल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Fri, 28 Jul 2023
  • 01:25 am
लवासा परिसरातून स्थलांतराचे आदेश

लवासा परिसरातून स्थलांतराचे आदेश

दरडीच्या संभाव्य धोक्यामुळे रामनगर, पडळघर आणि दासवेतील ३२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा सरकारच्या सूचना

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

मुळशी तालुक्याच्या लवासा परिसरात दरडीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना म्हणून तेथील कुटुंबांना अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी लेखी सूचना दिल्या आहेत.

याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रामनगर येथील चार, पडळघर येथील चौदा, मोरेवस्ती येथील चौदा अशा एकूण ३२ कुटुंबांच्या स्थलांतरणाबाबत पत्र तयार करण्यात आले असून,  त्यांचे स्थलांतरण केले जाणार आहे.

याबाबत ग्रामविकास अधिकारी सोमनाथ नवले म्हणाले, "रायगडच्या इर्शाळवाडी भूस्खलनाच्या घटनेनंतर प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून स्थलांतराची शिफारस केली होती. येथील डोंगरउतारावरील भागाची व परिस्थितीची व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनगर येथील प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्या ठिकाणी होणाऱ्या सततच्या अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरून दरडी कोसळून जीवित व वित्तहानी होऊन आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून तेथील रहिवासी कुटुंबे त्वरित अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाला पाहणी पथकाने सूचना केल्या होत्या."

ग्रामपंचायतीने तेथील कुटुंबातील सदस्यांना जनावरे आणि जीवनावश्यक इतर तत्सम वस्तू व साहित्य घेऊन त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रामनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी व तेथील कुटुंबे रामनगर येथील वाघजाई माता मंदिरामध्ये स्थलांतरित करावीत. पडळघर व दासवे येथील कुटुंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्थलांतरित करावीत, अशा सूचना दिल्या आहेत.'

दरम्यान, इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर विविध पथकांकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. आता आढळून येत असलेल्या मृतदेहांच्या विघटनाची प्रक्रिया सुरू झाली असून, गुरे आणि मानवी मृतदेहांमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे, तर मृतदेहांचे अवघे काही अवशेषच हाती येत असल्याचे विदारक चित्र आहे. ४३ कुटुंबे असलेल्या या वाडीमध्ये एकूण २२८ गावकरी वास्तव्यास होते. यातील दोन कुटुंबे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. चार दिवस राबवण्यात आलेल्या शोधकार्यामध्ये २७ रहिवाशांचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले असून, ५७ रहिवासी बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. तेथील बचावकार्य आता पूर्णत: थांबवण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story