पुण्यात तेलंगणाच्या बीआरएसचा प्रवेश, शहरभर बॅनरबाजी
विजय चव्हाण
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ने (बीआरएस) महाराष्ट्रात प्रवेश केल्याची दखल सर्वच राजकीय पक्षांनी घेतली असताना, या पक्षाने पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबरोबरच महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून पुण्यात चंचुप्रवेश करण्यासाठी ‘फलकबाजी’ सुरू केली आहे. स्वपक्षात नाराज असलेले राजकीय नेते ‘बीआरएस’च्या गुलाबी रंगात रंगण्यासाठी तयारीला लागले असून, प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘मोठे मासे’ गळाला लागल्याचा दावा ‘बीआरएस’च्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
शुक्रवारी प्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. दरम्यान, बीआरएस’ने पुण्यात वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात फलकबाजीने झाली आहे. शहरात प्रमुख ठिकाणी ‘बीआरएस’चे फलक झळकू लागले आहेत. तसेच या पक्षाने ऑनलाईन सभासद नोंदणीला प्राधान्य दिले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची पुण्यात जाहीर सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचेही नियोजन ‘बीआरएस’च्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती पेठांचा भाग वगळता उपनगरी परिसर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुसंख्य मतदार हे शेतीशी संबंधित आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू आणि मानवहीत लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या संपूर्ण पक्षासह तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात त्यांच्या सरकारी निवासस्थानी नुकताच प्रवेश केला आहे. स्वपक्षामध्ये स्थान मिळत नसल्याने किंवा पदापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे पुण्यातील अनेक नेते नाराज आहेत. राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना ‘बीआरएस’ हे एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आतापासून काही राजकीय नेत्यांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सर्वपक्षीय राजकारणी असले, तरी प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याचे ‘बीआरएस’कडून सांगण्यात आले.
याबाबत ‘बीआरएस’चे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी. जी. देशमुख म्हणाले की, ‘‘पक्षाने राज्यभर प्रचार आणि पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात तेलंगणा राज्य कसे यशस्वी झाले, हे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या ऑनलाइन सभासद नोंदणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे साडेआठ लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे. राज्यातील प्रमुख ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये पुण्याचाही समावेश आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.