उतावळ्यांच्या बाशिंगबाजीमुळे मनोरंजन
विजय चव्हाण
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे उमेदवार आहेत. ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान होईपर्यंत अनेक घटनांनी चर्चेत राहिली आहे. निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने की महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर बाजी मारणार याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. मात्र त्याच दरम्यान पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे 'कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र धंगेकर यांचे अभिनंदन' असा मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असून या फ्लेक्सची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहण्यास मिळत आहे.
रवींद्र धंगेकर यांनी शेअर केलेल्या या फ्लेक्सवरून थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच पुण्यातील वडगाव भागात धंगेकर यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले होते. या विरोधात पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने तक्रार दिल्यानंतर आता पोलिसात या प्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात राहुल मानकर आणि अतुल नाईक यांच्या विरोधात शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तर दुसरीकडे, पुण्यातील सारसबाग आणि वडगाव चौकात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. निकालाआधीच ‘आमदार हेमंत रासने’ असा उल्लेख करत समर्थकांकडून फलक लावून रासने यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच दोन्ही गटांकडून स्वयंघोषित विजय जाहीर करून फलकबाजी सुरू आहे. त्यामुळे, नक्की आचारसंहिता कोण भंग करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, ही स्टंटबाजी आहे की, एकमेकांविरोधात केलेल्या या कुरघोड्या आहेत, याचे उत्तर मात्र अजून गुलदस्त्यात आहे.
कसबा पोटनिवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. १९९२ पासून चालत आलेला गड राखण्याची जबाबदारी ही हेमंत रासनेंच्या खांद्यावर सोपवली आहे. मात्र या निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक कालपर्यंत पुण्यात तळ ठोकून होते, तर या निवडणुकीसाठी मित्रपक्षाची साथ भाजपने घेतली आहे. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रासनेंचा जोरदार प्रचार केला. म्हणून या निवडणुकीची चुरस वाढलेली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.