पुरे गुदमर, उभारा स्मॉग टॉवर

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात पुणे शहरात झालेल्या हवेच्या सर्वेक्षणाचा संदर्भ देत हडपसर येथील हवा सगळ्यात जास्त प्रदूषित असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, लहान मुले यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. विषारी हवेपासून सुटका मिळवण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर स्मॉग टॉवर उभारावेत, अशी मागणीही स्थानिक आमदारांनी केली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 01:28 pm
पुरे गुदमर, उभारा स्मॉग टॉवर

पुरे गुदमर, उभारा स्मॉग टॉवर

सर्वाधिक कचरा प्रकल्प असलेल्या हडपसरवासीयांची मागणी पोहोचली विधानसभेत, कचराबंदीचा इशारा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात  पुणे शहरात झालेल्या हवेच्या सर्वेक्षणाचा संदर्भ देत  हडपसर येथील हवा सगळ्यात जास्त प्रदूषित असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, लहान मुले यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला.  विषारी हवेपासून सुटका मिळवण्यासाठी  मुंबईच्या धर्तीवर स्मॉग टॉवर उभारावेत, अशी मागणीही स्थानिक आमदारांनी केली होती.

नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीनुसार, पुण्यातील सर्वाधिक प्रदूषण हडपसर मतदारसंघात आढळले.  पुण्याचा सगळा कचरा हडपसर मतदारसंघात येतो. जनावरे जाळण्याचा प्रकल्पदेखील या भागात आहे. अनेक प्रकल्पांमध्ये सातत्याने आग लागते किंवा लावली जात असल्याने ते वर्षभर धुमसत असतात. उरुळी देवाची, फुरसुंगी येथेही सर्वाधिक दुर्गंधीयुक्त हवा आहे. इथे स्मॉग टॉवर उपयुक्त ठरतील. किमान  शुद्ध हवा मिळण्यासाठी याची गरज असल्याचेही निष्पन्न झाले.  मोकळा श्वास घेऊ शकतील अशी हवा हा मूलभूत अधिकार आहे.  ते शक्य नसेल तर, या भागातले डझनभर प्रकल्प बंद करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.  

स्मॉग टॉवर हे हवेतील प्रदूषण कमी करण्याचे तंत्रज्ञान आहे. त्याचा जगभरात वापर केला जात आहे. भारतातील चंदीगड, दिल्ली येथे हे टॉवर बसवले आहेत. आता मुंबई शहरातही ते बसवण्याची सरकारची तयारी चालू आहे. या शहरासोबतच प्रदूषणाच्या बाबतीत पुणे शहराचा क्रमांक खूप वरचा आहे. ज्या ठिकाणी हे टॉवर बसवले आहेत, त्या ठिकाणी साडेतीनशे मीटर परिसरात हवा स्वच्छ करण्याचे अतिशय उत्तम असे काम  हे तंत्रज्ञान करते, असे तेथील परिस्थिती पाहिल्यावर  लक्षात आले आहे. याद्वारे हवेतील प्रदूषण ओढून घेऊन स्वच्छ हवा केली जाते.

हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे  म्हणाले, ‘‘हडपसर भागामध्ये जेव्हा जेव्हा हवा प्रदूषणाची चाचणी घेतली, त्यावेळी हवा प्रदूषणात त्याचा  कायम प्रथम क्रमांक आला. याचे कारण म्हणजे येथून महामार्ग जातो आणि त्यासोबतच कचरा प्रक्रियेचे सात-आठ प्रकल्प याच भागात आहेत. या प्रकल्पाजवळ कचऱ्याचे विघटन होऊन मिथेन, कार्बन डायऑक्साइडसारखे वायू तयार होत असतात. त्याची आजूबाजूच्या परिसरात लांबवर दुर्गंधी पसरते. 

त्या ठिकाणी  स्मॉग टॉवर उभे केले तर जागच्या जागी विषारी हवा फिल्टर करून स्वच्छ होईल. त्याचा आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याला फायदा होईल.’’ शहराच्या चहूबाजूंनी कचरा प्रकल्पाचे नियोजन करण्यापेक्षा हडपसरमध्येच कचरा प्रकल्प का उभारले जात आहेत, असा सवालही चेतन तुपे यांनी उपस्थित केला.  

‘‘मुंबईत हे टॉवर उभा करण्यात येत आहेत. तसेच इथेही उभारण्यात यावे. असे झाल्यास, कचऱ्यामुळे जे प्रदूषण होत आहे त्याला आळा घालता येईल. जसजसे तंत्रज्ञान विकसित होत जाईल तसा या टॉवरचा वापर वाढवता येतील. त्यामुळे येथील  नागरिकांना शुद्ध हवेत मोकळा श्वास घेता येईल,’’असे तुपे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.  

 स्थानिक नागरिक मनोज शिरसाट म्हणाले, ‘‘कचरा प्रकल्प ज्या ठिकाणी आहे, तेथे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे स्मॉग टॉवरची गरज आहे. या भागात हडपसर, फुरसुंगी, उरुळी, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट या ठिकाणी महापालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्याच्या चहूबाजूंनी नागरी वस्ती आहे. तेथील रहिवासी १०-१२ वर्षांपासून या प्रदूषणाचा त्रास सहन करत आहेत. तो आता थांबवला पाहिजे.  नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत करून त्याचा स्वीकार केला पाहिजे.’’

‘‘ज्याप्रमाणे पाणी फिल्टर केले जाते, तसेच  स्मॉग टॉवर हे  एक हवा  फिल्टर करण्याचे  मशीन आहे. हे मशीन हवेमध्ये असलेले विषारी, हानिकारक घटक यांना बाजूला करून हवेला स्वच्छ करून पुन्हा वातावरणामध्ये सोडते. भारतामधील  स्मॉग टॉवर हे २४ मीटर उंचीवरील हवेला शोषून घेऊन तिला शुद्ध करतो. या टॉवरचे लहान आणि मोठे असलेले थर हे हवेतील लहान आणि मोठ्या कणांना वेगळे करते. त्यानंतर हवेतील प्रदूषित कणांना काढून घेऊन हवा स्वच्छ करतो. ही स्वच्छ हवा दहा मीटर उंचीवरून पुन्हा वातावरणात, आकाशाच्या दिशेने सोडली जाते.  या यंत्राद्वारे प्रत्येक सेकंदाला २५ क्यूबिक मीटर एवढ्या वेगाने हवा शुद्ध केली जाते. एक टॉवर एक किलोमीटर अंतरापर्यंतची हवा स्वच्छ करतो. त्याच्या चहूबाजूंनी अनेक पंखे लावलेले असतात. ते प्रदूषित हवा स्वच्छ करण्याचे काम करत असतात,’’ अशी माहिती श्वसनविकारतज्ञ डॉ. मनोहर नाईक यांनी दिली.

स्थानिक नागरिक अविनाश काळे म्हणाले, ‘‘संपूर्ण पुणे शहरातून प्रक्रियेसाठी येथे कचरा आणला जातो. परंतु त्यावर काहीच प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे हवा प्रदूषित होत आहे. त्याचा ससाणेवाडी, काळेपडळ, गोंधळेनगर, हडपसरगाव, सातववाडी अशा अनेक ठिकाणी लाखो नागरिकांना दूत्रास होत आहे.  अनेकदा कचरा प्रकल्पात आग लागल्याच्या घटना घडतात. त्यामुळे धुराचा त्रास होतो. पावसाळ्यात याची दूरवर दुर्गंधी पसरते. त्यावर लवकरात लवकर उपाय करावे.’’

‘सीविक मिरर’ने पुणे महापालिकेचे  पर्यावरण संवर्धन अधिकारी मंगेश दिघे यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘‘स्मॉग टॉवर बसवण्याबाबतची मागणी करण्यात आल्याचे मला अद्याप माहित नाही. पण आवश्यकता भासल्यास त्या भागात हे टाॅवर बसवण्यात येतील.’’ स्मॉग टॉवर हे दोन प्रकारचे आहेत. त्यांचा अभ्यास करून त्यापैकी कोणता अधिक फायदेशीर आहे ते पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story