पुरे केपीचा तोरा गड्या, आपला मुंढवाच बरा!

शेक्सपिअर म्हणून गेला आहे की, ‘नावात काय आहे?’ पण पुणे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांना नावातले अर्थकारण नेमके समजले आहे. त्यामुळेच कोरेगाव पार्क नावातील 'उच्चभ्रू' पणा एनकॅश करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या युक्ती लढवल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Fri, 7 Jul 2023
  • 09:41 am
पुरे केपीचा तोरा गड्या, आपला मुंढवा च बरा!

पुरे केपीचा तोरा गड्या, आपला मुंढवाच बरा!

बांधकाम व्यावसायिक नावातले अर्थकारण 'एनकॅश' करण्यासाठी कोरेगाव पार्कपासून मैलभर अंतरावर असलेल्या मुंढव्यातील भागाला देताहेत कोरेगाव पार्क 'ॲनेक्स', 'न्यू' कोरेगाव पार्क, कोरेगाव पार्क 'नेक्स्ट', 'अप्पर' कोरेगाव पार्क अशी नावे. करताहेत मुंढवा नावाची ओळख पुसण्याचा प्रयत्न, स्थानिकांचा विरोध

विजय चव्हाण/ नितीन गांगर्डे

vijay.chavan/nitin.gangarde@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

शेक्सपिअर म्हणून गेला आहे की, ‘नावात काय आहे?’ पण पुणे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांना नावातले अर्थकारण नेमके समजले आहे. त्यामुळेच कोरेगाव पार्क नावातील 'उच्चभ्रू' पणा एनकॅश करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या युक्ती लढवल्या आहेत. अगदी कोरेगाव पार्कपासून मैलभर अंतरावर असलेल्या शेजारील मुंढव्यातील भागालाही कोरेगांव पार्क  'ॲॅनेक्स',  'न्यू' कोरेगाव पार्क,  कोरेगाव पार्क 'नेक्स्ट',  'अप्पर' कोरेगाव पार्क अशी नावे देऊन ग्राहकांकडून दुप्पट रक्कम आकारून बांधकाम व्यावसायिक आपला गल्ला भरत आहेत.  

मुंढवा गावातील काही स्थानिकांनी मात्र या नावाच्या बाजारीकरणाला ठाम विरोध केला आहे. गावाचे नावच नकाशावरून हटवण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  ‘‘मुंढव्याच्या भागाला कोरेगाव पार्क संबोधून स्थानिक इतिहास, भूगोल बदलू नये,’’ अशी विनंती त्यांनी विविध बांधकाम व्यावसायिकांना केली आहे. मुंढव्यातील बांधकाम प्रकल्पांचे फलक,  माहितीपत्रके, बॅनर्स, वर्तमानपत्रातील जाहिराती, होर्डिंगमधून कोरेगाव नावाचा उल्लेख वगळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.  ‘‘व्यावसायिकांनी व्यवसाय करावा त्याला आमचा विरोध नाही,  मात्र गावाच्या मूळ नावाची ओळख त्यांनी मिटवू नये,’’ असे स्थानिकांचे म्हणणे आहे.                  

कोरेगाव पार्क हा हिरवागार, स्वच्छ, सुंदर परिसर आहे. एक व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही त्याची ओळख आहे. या परिसरात विविध हॉटेल्स, लाइव्ह म्युझिक बार, पब, ट्रेंडी कॅफे, ट्रेंडी डायनिंग, नाइटलाइफ हब, आर्ट गॅलरी अशी अनेक ठिकाणे आहेत. विमानतळ, पुणे जंक्शन रेल्वे स्थानक येथून जवळ आहेत. त्यामुळे या परिसराचे संगीत-कलाक्षेत्राचे चाहते, खवय्ये यांच्यासह अनेकांना आकर्षण आहे. या परिसराची नागरिकांच्या मनात उच्च प्रतीची प्रतिमा आहे. नेमकी हीच बाब हेरून हे नामांतर  सुरू आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर कित्येक वर्षांपासून येथे नांदत असलेले मुंढवा गाव विस्मरणात जाण्याची शक्यता काही स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थानिक अस्मिताच मिटवली जाईल का, अशी भीती काही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

‘‘येथील व्यावसायिक स्वतःच्या हिताकरता जाहिरात पुस्तके, समाजमाध्यमातील जाहिराती, जाहिरात फलकावर सर्रासपणे चुकीचा नामोल्लेख करत आहेत. त्यासाठी त्यांनी कोणाची परवानगी घेतली, हे कळायला मार्ग नाही. महसूल खात्यात मात्र अजूनही या गावाचे नाव मुंढवा आहे. याबाबत अनेक सरकारी महसूल दप्तर तपासले. त्याविषयी, जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालय, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र त्यांच्यापैकी कोणीच याकडे गांभीर्याने पाहिले नाही. याचा अर्थ त्यांचाही बदलत असलेल्या नावाला पाठिंबा असल्याची शंका येते. चुकीच्या नावाची जाहिरात करून मूळ गावाचे नाव परस्पर बदलण्याचा हा प्रकार महिनाभरात थांबवला नाही तर राज्य सरकारच्या जाहिरात आयोगाकडे आम्ही तक्रार करू,’’ असे पुणे शहर जिल्हा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर यांनी सांगितले.    

मुंढव्याच्या महसूल क्षेत्राचे नाव मुंढवाच आहे. त्या संबंधित असलेल्या सगळ्या कागदपत्रांवर, सातबारा, खातेउतारा यावर मुंढवा हेच नाव आहे. मात्र काही व्यावसायिक स्वतःच्या फायद्याकरिता परस्पर कोरेगाव पार्क हे नाव घुसवत असल्याचे आढळून येत आहे. कोरेगाव पार्क या नावाला एक प्रतिष्ठेचे वलय आहे. त्यामुळे त्याचे नाव दिल्यास येथील फ्लॅटचे व्यवहार लवकर होतात. त्यासाठी विकसकांना चांगली रक्कमही मिळते. घेणाऱ्यालाही आपण कोरेगाव पार्क परिसरात राहणार असल्याचा भास होतो. मात्र यामध्ये सर्वांचीच फसवणूक होत आहे. हे नावे बदलणारे येथील विकसकच आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.  

‘‘मुंढवा गावाला मोठा इतिहास आहे. या गावात महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी काम केले आहे. या क्रांतिकारकांनी या गावात शाळा सुरू केली. ती चालवली. इथल्या नागरिकांना सुशिक्षित केले. तसेच प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुले यांनी इथल्या नागरिकांना मदत केली. माझा जन्म त्याच गावात झाला आहे. बालपणापासून अनेक अविस्मरणीय आठवणी या गावासोबत जोडल्या आहेत. मी शालेय जीवनात खो-खो खेळाडू होतो. मुंढव्याचा संघ म्हणून आमच्या संघाची ओळख होती. त्याच नावाने आम्ही राज्य पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली. मात्र आज काहीजण स्वतःच्या फायद्यासाठी या गावाचे नाव मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दुःखद आहे,’’ असे मत बांधकाम व्यावसायिक रामचंद्र कोलते यांनी व्यक्त केले.  

या गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली खुणे-तापकीर  ‘सीविक मिरर’शी बोलताना म्हणाल्या, ‘‘माझे आई-वडील याच गावात राहात होते. गावासोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. मात्र आमच्या या गावाचीच ओळख पुसली जात आहे. त्याला माझा गावकरी म्हणून विरोध आहे.’’

‘‘२० वर्षांपासून मुंढवा गावाचे गावपण हळूहळू हरवत चालले होते. त्याचे नागरीकरण होताना नीट नियोजन करण्यात आले नाही. व्यवस्थापन चुकल्यामुळे येथे अनेक समस्या निर्माण झाल्या. येथील पुढाऱ्यांचे हे अपयशच म्हणावे लागेल. त्यांना योग्य व्यवस्थापन करता आले नाही. आता नाव पुसले जात असताना तरी त्यांनी जुनी ओळख टिकवावी,’’ अशी अपेक्षा मिसळ व्यावसायिक विश्वास झगडे यांनी व्यक्त केली.

‘‘नदीकाठचे हे छोटे गाव शिवपूर्वकालीन आहे, अशी माहिती मिळाली. गायकवाड, लोणकर आणि कोद्रे ही येथील मूळ घराणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई या येथील गायकवाड घराण्यातील आहेत, अशी माहिती बुजुर्ग मंडळींनी दिली. त्यामुळे गुलामीचा इतिहास असलेल्या कोरेगाव पार्कचे नावही आम्हाला नको,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया मोहन भुजबळ यांनी दिली.  

हडपसर, घोरपडी, मांजरी, कोरेगाव पार्क, खराडी या परिसराच्या घेऱ्यात राहणाऱ्या मुंढव्याचा विकास तुलनात्मकरित्या खूपच कमी वाटतो. गावकरी म्हणतात की, मगरपट्टा सिटी, ॲमानोरा पार्क या अत्याधुनिक वसाहती मुंढव्यानजीकच आहेत. परंतु असा विकास साधायला गावाला किती वर्षे लागणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातच असे नामांतराचे प्रयत्न गावाच्या उरल्यासुरल्या अस्मितेवर घाला घालणारे असल्याचे मत श्रीहरी कोद्रे यांनी व्यक्त केले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story