‘इंजिनिअरिंग’च्या चुका सुधारणार

दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांची संख्या आणि वर्दळ पेलण्यास असमर्थ ठरणारे रस्ते, रस्त्यांची कामे करताना नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीतील अडथळे, चुकलेल्या पदपथांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा अशा ‘इंजिनिअरिंग’ मधील चुकांमुळे पुणेकरांची वाट बिकट झाली होती. ही बिकट वाट सरळ करण्याचा घाट घातला असून या ‘इंजिनिअरिंग’ चुका दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर अडचणींचे ठरणारे फिडर, पिलर आणि पथ दिवे रस्त्यातून हटवले जाणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 12 Mar 2023
  • 10:15 am
‘इंजिनिअरिंग’च्या चुका सुधारणार

‘इंजिनिअरिंग’च्या चुका सुधारणार

महापालिकेने निवडलेल्या १५ रस्त्यांवरील अडथळा ठरणारे पदपथ, दिवे, फिडर हटवणार

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांची संख्या आणि वर्दळ पेलण्यास असमर्थ ठरणारे रस्ते, रस्त्यांची कामे करताना नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीतील अडथळे, चुकलेल्या पदपथांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा अशा ‘इंजिनिअरिंग’ मधील चुकांमुळे पुणेकरांची वाट बिकट झाली होती. ही बिकट वाट सरळ करण्याचा घाट घातला असून या ‘इंजिनिअरिंग’ चुका दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर अडचणींचे ठरणारे फिडर, पिलर आणि पथ दिवे रस्त्यातून हटवले जाणार आहेत. शहरातील नगररस्ता, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसर, पाषाण रस्ता, राजभवन रस्ता, सातारा आणि सोलापूर रस्त्यासह पंधरा रस्त्यांवरील इंजिनिअरिंगच्या चुका दुरुस्त केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर काळानुसार निर्माण झालेले रस्त्यातील अडथळे दूर केले जाणार आहेत.

समाविष्ट २३ गावांसह २०११ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ३५.५४ लाखांवर आहे. लोकसंख्या वाढीच्या गणितानुसार २०२१ अखेरीस ही लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात गेल्याचा अंदाज आहे. शहरातील वाहनांची संख्याही ४५ लाखांवर गेली आहे. एवढ्या प्रचंड वाहनांसाठी शहरातील रस्त्यांचे जाळेही तितकेच भक्कम हवे. लहान-मोठे रस्ते मिळून शहरात सुमारे १४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्याचबरोबर शहरातील उड्डाणपुलांची संख्याही लक्षणीय आहे. हे रस्ते करताना अनेकदा इंजिनिअरिंगच्या चुकाही झाल्या आहेत. अशाच चुकांची भरपाई करताना विद्यापीठ परिसरातील पूल पाडावा लागला. हडपसर येथील एक पूल कसा चुकीचा आहे याची जाहीर कबुलीही काही राजकीय नेत्यांनी यापूर्वीच दिली आहे. या चुकांचा गंभीर परिणाम पुणेकरांना असह्य अशा वाहतूक कोंडीतून सोसावा लागत आहे. 

शहराचा विस्तार कात्रज, हडपसर, बालेवाडी, बोपोडी, वारजे, उंड्रीच्याही पुढे पोहोचला आहे. क्षमता पार करून अफाट वाढलेली लोकसंख्या आणि वाहनांना सामावून घेण्यासाठी अपुरे पडणारे रस्ते यामुळे पुणे शहरातून एका भागातून दुसऱ्या भागात जाणे एक दिव्य ठरत आहे. त्यातच काही रस्त्यांमध्येच पदपथ, पथदिवे, वीजवाहिन्या, फिडर, पिलर असे अनेक अडथळे उभे ठाकलेले आहेत. असे अडथळे दूर केले तर वाहतूक कोंडीची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल असा अंदाज आहे.  महापालिका, वाहतूक पोलीस, वाहतूक तज्ज्ञांच्या सूचनेनुसार महापालिकेने शहरातील पंधरा रस्त्यांची पाहणी केली. या रस्त्यांवरील अडथळे दूर करण्याबरोबरच त्यांचे सुशोभिकरण केले जाणार आहे.

सुशोभिकरण या १५ रस्त्यांचे...

जानेवारीमध्ये शहरात झालेल्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने निवडक रस्त्यांची दुरुस्ती आणि सुशोभिकरण करण्यात आले होते. त्यावेळी महापालिकेवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेने शहरातील १५ रस्त्यांची निवड करत ते सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मगरपट्टा रस्ता, सोलापूर रस्ता, नगररस्ता, सातारा रस्ता, पुणे-मुंबई रस्ता, पाषाण रस्ता, राजभवन रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, जवाहरलाल नेहरू रस्ता, शंकरशेठ रस्त्याची निवड करण्यात आली आहे.

...म्हणून या रस्त्यांना प्राधान्य

शहरातील पंधरा रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार असली तरी त्यातील मगरपट्टा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, राजभवन रस्त्यावरील कामे तातडीने करण्यात येणार आहेत. त्याचे कारण म्हणजे जून महिन्यात जी-२० परिषदेतील दुसऱ्या टप्प्यातील बैठका पुण्यात होणार आहेत. या रस्त्यांवरून पाहुणे जाणार असल्याने येथे अधिक वेगाने कामे होतील. त्यात वृक्षारोपण, रस्ते एकसलग करणे, फिडर पिलर हटवणे आदी कामांचा समावेश आहे. 

अशा ‘इंजिनिअरिंग’ चुका 

शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटल ते बंडगार्डन पूल हा शहरातील वर्दळीचा वाहतूक असलेल्या रस्त्यांपैकी एक महत्त्वाचा रस्ता आहे. यात शिवाजीनगर रेल्वे स्थानक, पुणे स्थानक, आरटीओ, संचेती हॉस्पिटल आणि जंगली महाराज रस्त्याला जोडणारा रस्ता येतो. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय याच रस्त्यावर येत असून, जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारा रस्ताही येथूनच जातो. संचेती हॉस्पिटलकडून जंगली महाराज रस्त्याकडे जाताना कलानिकेतन इमारतीसमोरील पदपथ एकदम रस्त्यावर आला आहे. हा पदपथ दोन ते तीन फूट कमी केला जाणार आहे. आरटीओ समोरील सुशोभिकरणासाठी बनवलेला आयलँड तोडला जाईल. त्याच बरोबर मेट्रो पुलाशेजारी एसएसपीएमएस शाळेलगत मेट्रोने बांधलेला भलामोठा पदपथ वाहतुकीला अडथळा ठरत आहे. जहांगीर हॉस्पिटल जवळील मेट्रोच्या स्थानकालगत बांधलेला पदपथही वाहतुकीस अडथळा ठरत आहे. या पदपथामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने मेट्रोचे दोन्ही पदपथ येत्या आठवडाभरात काढले जाणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story