वृक्षांच्या कत्तलीविरोधात पुणेकरांचे चिपको आंदोलन

बहुतांश पुणेकर शनिवारी (दि. २९) संध्याकाळी कुठे फिरायला जायचे, या विचारात असतानाच हजारो संवेदशनील पुणेकरांनी चिपको आंदोलन करीत नदीपात्र सौंदर्यीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या वृक्षतोडीविरोधात एल्गार पुकारला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:28 am
वृक्षांच्या कत्तलीविरोधात एल्गार!

वृक्षांच्या कत्तलीविरोधात पुणेकरांचे चिपको आंदोलन

चिपको आंदोलनाला हजारो पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महापालिकेच्या मुळा-मुठा नदीपात्र सौंदर्यीकरणाला ठाम विरोध

प्रिन्स चौधरी / नितीन गांगर्डे

feedback@civicmirror.in

बहुतांश पुणेकर शनिवारी (दि. २९) संध्याकाळी कुठे फिरायला जायचे, या विचारात असतानाच हजारो संवेदशनील पुणेकरांनी चिपको आंदोलन करीत नदीपात्र सौंदर्यीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या वृक्षतोडीविरोधात एल्गार पुकारला.

पुणे महापालिका मुळा आणि मुठा नद्यांच्या पात्रांचे सौंदर्यीकरणाचा प्रकल्प राबवित आहे. या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली नदीपात्रातील हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याला पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी ठाम विरोध दर्शवल्यानंतरही महापालिका या प्रकल्पावर ठाम आहे. महापालिका जुमानत नाही म्हटल्यावर जागरूक पुणेकरांनी जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजीराजे उद्यानापासून नदीपात्राकडे जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्यावर अनोखे ‘चिपको आंदोलन’ केले. यात त्यांनी नदीपात्रातील वृक्षांना आलिंगन देत त्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्रतिबद्धतेची ग्वाही दिली. यावेळी लक्ष वेधून घेणारे फलक आणि नावीन्यपूर्ण घोषणा यांच्या जोरावर सुमारे अडीच हजार आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यात चार वर्षांच्या चिमुरड्यांपासून ९० वर्षांच्या वृद्धांपर्यंतचे पुणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आंदोलकांमध्ये विदेशी नागरिकांचा सहभाग लक्षवेधी ठरला. समाजमाध्यमांवर तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘चिपको आंदोलना’त सहभागी झालेल्या मधुमिता उल्हीयारकर म्हणाल्या, ‘‘वृक्ष आणि नदीपात्र यांचे अस्तित्व कायम राहावे, या उद्देशाने आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. महापालिका आपल्याकडून वसूल केलेला कररुपी पैसा अनावश्यक अशा नदी सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पावर खर्च करीत आहे. पुणेकरांनी समोर येऊन या मनमानीला विरोध करायला हवा. महापालिकेने प्रथम नदी स्वच्छ करायला हवी. आम्ही सौंदर्यीकरणाच्या विरोधात अजिबातही नाही. मात्र, त्याच्या नावाखाली चालणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीला आमचा ठाम विरोध आहे.’’

नदीपात्र सौंदर्यीकरणाच्या नावाखाली महापालिकेकडून चालवण्यात येत असलेल्या करदात्यांच्या पैशांच्या उधळपट्टीबाबत वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘‘हा संपूर्ण प्रकल्प म्हणजे पैशांची नासाडी आहे. त्याएेवजी महापालिकेने मैलाशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करायला हवे. प्रक्रिया न करता सांडपाणी नदीतच सोडले जात असेल तर हा प्रकल्प निरर्थक ठरतो. शहरात दररोज १६०० ते १७०० एमएलडी इतके सांडपाणी तयार होते. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा जेआयसीए एसटीपी हा प्रकल्प २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. मात्र तो पुरेसा ठरणार नाही. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतरही ७०० ते ८०० एमएलडी सांडपाणी नदीत सोडले जाईल. पुण्याची दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता, शहरातील सांडपाणी प्रक्रियाविराहित राहू नये, यासाठी महापालिकेने गुंतवणूक करायला हवी. प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडल्यानंतर हे भयंकर प्रदूषित पाणी पुढे अनेक गावांमध्ये वापरले जाते. महापालिकेच्या नदीपात्र सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पामुळे वृक्षांची कत्तल तर होणारच आहे.

त्याचबरोबर पर्यावरणाची अपरिमित हानीदेखील होईल,’’ असा इशारा वेलणकर यांनी दिला.

पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते सारंग यादवडकर म्हणाले, ‘‘महापालिकेचा नदीपात्र सौंदर्यीकरण प्रकल्प हा नदीपात्रांची वाट लावणारा आहे. यामुळे नदीचे पात्र तब्बल ४० टक्क्यांनी आक्रसले जाईल. महापालिकेच्याच अहवालानुसार, यामुळे पुराची पातळी ५ फुटांनी वाढणार आहे. असे झाल्यास पुणे हे पूरग्रस्त शहर बनेल. येत्या काही वर्षांत पावसाचे वार्षिक प्रमाण ३७.५ टक्क्यांनी वाढणार आहे. या सर्वांचा विचार करता, विनापरवानगी हजारो झाडे तोडणे विनाशाला निमंत्रण ठरेल. हे थांबायला हवे.’’

चिपको आंदोलनात सहभागी झालेले नरेंद्र पटवर्धन म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या लाडक्या नदीला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. प्रस्तावित नदीपात्र सौंदर्यीकरण प्रकल्प हा नदीला पूर्णपणे नष्ट करणारा आहे. प्रेतस्वरूप नदीपेक्षा जिवंत नदी कधीही चांगली. आमच्या आंदोलनाची दखल घेऊन हा प्रकल्प रद्द होईल, अशी आशा आहे.’’

निदर्शने केल्यानंतर सर्व आंदोलक नदीकिनारी असलेल्या रस्त्यावर जमले आणि त्यांनी वृक्षांना आलिंगन दिले तसेच त्याच्या सभोवताली मानवी साखळी तयार केली. नदीपात्राजवळ राहणाऱ्या  मयूरी गांधी म्हणाल्या, ‘‘नदीबद्दलच्या प्रेमापोटी  मी या आंदोलनात सहभागी झाली आहे.  हे आंदोलन मुख्यत: नदीपात्रातील वृक्षांची कत्तल थांबावी, यासाठी आहे. त्याबरोबर नदीपात्रात होणारे बांधकाम रोखून नदीचे संरक्षण व्हावे, हाही उद्देश आहे.’’

या विषयासंदर्भात सिम्बायोसिस सेंटर फाॅर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे संचालक डाॅ. माणिक धानुरकर यांच्याशी ‘सीविक मिरर’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘पर्यावरणविषयक जागृतीच्या दृष्टीने विचार करता महापालिका प्रशासनाचे डोळे उघडावे, यासाठी जागरूक पुणेकरांनी एकत्र येऊन केलेले हे आंदोलन खूप महत्त्वाचे आहे. वृक्ष नाही म्हणजे पाणी नाही आणि पाणी नाही म्हणजे  जीवन नाही. ज्या सल्लागारांना कोट्यवधी रुपये शासनाकडून दिले जातात, त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी योग्य सल्ला द्यायला हवा. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही. ही जनचळवळ आहे. पुणेकर जागरूक असल्याचा हा पुरावा आहे. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण आता कृती केली नाही, तर त्याचा फटका भावी पिढ्यांना बसेल. या प्रकल्पासाठी ७ हजारापेक्षा जास्त वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. यापैकी काही झाडे कापणे सुरू आहे. नदीपात्र सौंदर्यीकरणाच्या नावाखाली सुरू असलेला हा सर्वप्रकार हास्यास्पद आहे.’’

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांची अनुपस्थिती

या चिपको आंदोलनात आम आदमी पार्टी, काॅंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यांची अनुपस्थिती डोळ्यांत भरणारी होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नदीपात्र सौंदर्यीकरण प्रकल्प मंजूर व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने मदत केली होती. मात्र, बालभारती-पौड फाटा रस्ता प्रकल्पाच्या विरोधात मात्र हा पक्ष सहभागी होता. सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीने नदीपात्र सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या बाजूने मतदान केले होते. अनोख्या कल्पना वापरून आंदोलन करण्यात मनसे नेते वसंत मोरे आघाडीवर असतात. या आंदोलनातही ते मागे नव्हते. पिसे लावलेली मोरासारखी पगडी घालून ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यामुळे ते आंदोलकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले होते. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढले. मनसेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख नितीन जगताप यांनी ‘यमराजा’ची वेषभूषा केली होती. ते म्हणाले, ‘‘महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आम्ही या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मात्र सत्ताधारी पक्ष आणि एका प्रमुख विरोधी पक्षाने या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याने प्रकल्प मंजूर झाला.  यापुढे एकही झाड कापले जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यावर ठाम राहणार राहू.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story