वीजपुरवठा खंडित, रॉडने मारहाण

बिलाच्या थकबाकीमुळे घराचा वीज पुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून महावितरणच्या दोन जनमित्रांना लोखंडी रॉडने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. रविवारी, २६ मार्च रोजी आंबेठाण रोड येथील साईसाम्राज्य सोसायटीमध्ये ही घटना घडली. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 12:14 pm
वीजपुरवठा खंडित, रॉडने मारहाण

वीजपुरवठा खंडित, रॉडने मारहाण

आंबेठाणमधील घटनेत महावितरणचे दोन कर्मचारी जखमी, तीन आरोपींना अटक

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

बिलाच्या थकबाकीमुळे घराचा वीज पुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून महावितरणच्या दोन जनमित्रांना लोखंडी रॉडने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम  मारहाण करण्यात आली. रविवारी, २६ मार्च रोजी आंबेठाण रोड येथील साईसाम्राज्य सोसायटीमध्ये ही घटना घडली. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. 

महावितरणकडून सध्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम चालवली जात आहे. चाकण येथील महावितरणचे विद्युत सहायक मयूर चंद्रकांत चौधरी हे आपले सहकारी प्रदीप शेवरेसमवेत रविवारी सकाळी साडेनऊ वाजता चाकण शहरातील माउलीनगर येथे लघुदाब वाहिनीची तुटलेली तार दुरुस्त करण्यासाठी गेले होते. तेथील काम झाल्यानंतर ते साडेअकरा वाजता आंबेठाण रोड येथील साईसाम्राज्य सोसायटीमध्ये मीटर बदलण्याच्या कामासाठी गेले होते. त्या ठिकाणी या दोघांना अक्षय पन्नालाल चोरडिया याने अडवले. चोरडियाचे वीज बिल थकले म्हणून मयूर आणि प्रदीप यांनी फेब्रुवारी महिन्यात वीज पुरवठा खंडीत केला होता. याचा राग मनात धरून चोरडिया त्यांना धमकावू लागला. आम्हाला सांगितल्याशिवाय वीज पुरवठा कसा खंडीत केला म्हणून तो वाद घालू लागला. त्याच्याशी वाद घालण्याऐवजी मयूर आणि प्रदीप तेथून जाऊ लागले. ते जात असताना अक्षय चोरडिया याने 'तुम्ही सोसायटीच्या बाहेर कसे जाता तेच पाहतो' असे म्हणत मयूर यांच्या गाडीची चावी काढून घेतली. त्यावेळी मयूर आणि प्रदीप हे चोरडियाला समजावून सांगू लागले. 'तुमचे लाईट बिल थकलेले होते. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने कारवाई करावी लागली. ते आमचे कामच आहे. तुम्ही आमचे शत्रू नाहीत. आम्ही आमचे शासकीय कर्तव्य पार पाडले'. मात्र, चोरडिया काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने त्याच्या लहान भावास आकाश चोरडिया यास बोलावून घेतले. आकाश येताच त्याने कमरेचा पट्टा काढून मयूर यांना जोरजोरात मारण्यास सुरुवात केली. त्यांना सोडवण्यासाठी प्रदीप मध्यस्थी करू लागले. त्यावेळी अक्षय चोरडिया याने त्यांचा गळा दाबून मोठ्याने शिव्या देत पोटावर बुक्कीचे ठोसे लगावले. त्याचा आवाज ऐकून येथे पन्नालाल चोरडिया आला. त्यानेही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 'तुमच्या साहेबाला बोलवा. तुम्ही कसे सोसायटीच्या बाहेर जाता तेच पाहतो' असे म्हणत त्यांना थांबवून ठेवले. 

 मयूर आणि प्रदीप यांना मारहाण करत चोरडिया याने शासकीय कामकाजात अडथळा आणला. मयूरने आपले सहकारी मदन मुळुक, गंगाराम तळपे आणि सचिन राऊत यांना फोन करून झालेल्या मारहाणीचा प्रकार सांगितला. माहिती मिळताच त्या ठिकाणी राऊत आले. ते आणि  सोसायटीमधील इतर लोक मध्यस्थी करत चोरडियाला समजावून सांगत होते. त्यावेळी आकाश चोरडिया याने लोखंडी रॉड आणला. मयूर यांना धक्काबुक्की करत तेथून धक्के मारत दूर नेले. आकाशने बोलावलेल्या पैकी एका तरुणाने मयूरला पुन्हा मारहाण केली. आकाशने लोखंडी रॉडने मयूर यांच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. त्यामुळे मयूर यांच्या डोक्यावर जखम होऊन रक्त वाहू लागले. मयूरने जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. 

मयूर तेथून रस्त्यावर आले असता नीलेश शेवकरी, प्रणव गोरे, राऊत यांनी त्यांना  दवाखान्यात उपचारासाठी नेले. 

मयूर यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी अक्षय पन्नालाल चोरडिया, आकाश पन्नालाल चोरडिया, पन्नालाल शंकरलाल चोरडिया आणि एक अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील अक्षय चोरडिया, आकाश चोरडिया, पन्नालाल चोरडिया या तीन आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे. हे तिघेही चाकण येथील आंबेठाण रोड, साईसाम्राज्य सोसायटीमध्ये राहतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story