‘पेटलेल्या’ पतीने पेटवल्या आठ गाड्या!

पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दाखल केल्याने चिडलेल्या नवऱ्याने परिसरातील दुचाकी आणि चारचाकी मिळून ८ ते १० गाड्या पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. यात बायकोच्याही दुचाकीचा समावेश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Mar 2023
  • 11:09 am
‘पेटलेल्या’ पतीने पेटवल्या आठ गाड्या!

‘पेटलेल्या’ पतीने पेटवल्या आठ गाड्या!

पत्नीने घटस्फोटासाठी तक्रार दाखल केल्याने चिडून कृत्य, पत्नीच्याही गाडीचा समावेश

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दाखल केल्याने चिडलेल्या नवऱ्याने परिसरातील दुचाकी आणि चारचाकी मिळून ८ ते १० गाड्या पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. यात बायकोच्याही दुचाकीचा समावेश आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या कारणाचा तपास करीत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील अश्रफनगर परिसरातील अलिफ टाॅवरसमोर हा पहाटे पाचच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. टेरेन्स जॉन असं आरोपी पतीचे नाव आहे. त्याच्या पत्नीने जॉनची पत्नी एलिनाने त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. यामुळे चिडलेल्या जाॅनने परिसरातील गाड्या पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. यात लाखो रुपयांच्या वाहनांची राख झाली आहे. गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन संपूर्ण वस्तीला आग लागता-लागता राहिली. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. जाॅनच्या या माथेफिरू कृत्यामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून या विरोधात पोलीस काय कारवाई करतात, याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.

आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी एलिना जेकब यांचा ६ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही काळ त्यांचा संसार सुरळीत चालला. आरोपी कोणतेही काम करत नव्हता. त्यांना एक मुलगी झाली. नंतर जाॅन दारू, गांजाचे व्यसन करून एलिनाला मारहाण करू लागला. त्याच्या त्रासाला वैतागून तीन वर्षांपूर्वी एलिना अश्रफनगर येथे माहेरी येऊन आई आणि बहिणीसोबत राहत होती. ब्युटीपार्लरमध्ये काम करून ती घर चालवत होती. जाॅन नशा करून रात्री येथे येऊन एलिनासह तिच्या आईला   शिवीगाळ करत मारहाण करत असे. अनेकदा तलवार, कोयते घेऊन पत्नीला धमकावत असे. त्याने ब्लेडने पत्नी आणि सासूवर वार केलेल आहेत. त्याचे निशाण एलिना आणि तिच्या आईच्या हातावर आहेत. या त्रासाला वैतागून २४ वर्षीय एलिनाने घटस्फोटासाठी पोलिसांकडे अर्ज दिला.

याचा राग येऊन टेरेन्स याने सोमवारी रात्री अकरा वाजता एलिनाच्या घरी येऊन जोरजोरात शिवीगाळ करत धिंगाणा घातला. दरवाज्यावर लाथा मारत धडाका देऊ लागला. दरवाजा उघडत नसल्याने त्याने खिडकीच्या काचा फोडल्या. जाॅनला आवरण्यासाठी एलिनाने ११२ क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी चौकीत नेऊन त्याला समज देत सोडवले. पुन्हा तो पहाटे चार वाजता अश्रफनगर येथील एलिनाच्या घरी येऊन शिवीगाळ करून दरवाजावर धडका मारू लागला. कोणीच दरवाजा उघडवत नसल्याने त्याने घराबाहेर उभीअसलेली आठ वाहने पेट्रोल ओतून पेटवून दिली.

जाॅनने गाड्यांना आग लावल्याचे लक्षात येताच एलिनाने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना उठवले. तब्बल एक तासानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत वाहनांची राख झाली होती. ‘‘अश्रफनगर येथील वस्तीतील घरे दाटीवाटीने आहेत. पेटवलेली वाहनातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाला असता तर संपूर्ण वस्तीला आग लागली असती. नागरिकांनी वेळीच आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली,’’ असे येथील रहिवासी साहिबाझ शेख यांनी सांगितले.

येथील रहिवासी सद्दाम शेख म्हणाले, ‘‘आमच्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. आमचे घर त्यावरच चालते. आता आम्ही काय खायचे?’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story