पुन्हा ईडीची छापेमारी

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सेवा विकास बँक प्रकरणात पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमध्ये चार तर पुण्यात एका ठिकाणी छापेमारी केली. मंगळवारी (४ एप्रिल) दिवसभर ही कारवाई सुरू होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 5 Apr 2023
  • 09:12 am
पुन्हा ईडीची छापेमारी

पुन्हा ईडीची छापेमारी

सेवा विकास प्रकरणातील अनेक बडे मासे लागणार गळाला

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सेवा विकास बँक प्रकरणात पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमध्ये चार तर पुण्यात एका ठिकाणी छापेमारी केली. मंगळवारी (४ एप्रिल) दिवसभर ही कारवाई सुरू होती.

सेवा विकास बँकेचा माजी अध्यक्ष ॲड. अमर मूलचंदानी याच्या घरावर ईडीने २७ जानेवारीला छापा मारल्यानंतर मूलचंदानीने नऊ तास घरातच लपून महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी मूलचंदानी, त्याचा भाऊ माजी सहायक सरकारी वकील अशोकसह मूलचंदानी कुटुंबावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीकडे कंत्राटी कामगार असलेल्या दोघांना आणि मूलचंदानीचा नोकर  

बबलू सोनकरला अटक करण्यात आली होती. बबलूच्या माध्यमातून या दोघांना हाताशी धरून मूलचंदानीने काही कागदपत्र मिळवण्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुन्हा सेवा विकास बँकैचा माजी संचालक आणि भाजपच्या कोट्यातून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्य राजू सावंत त्याचबरोबर भल्ला साबळे, मूलचंदानीची बहीण या तिघांच्या पिंपरी परिसरातील घरी छापा टाकला. मूलचंदानीचे निकटवर्तीय असलेल्या महापालिकेतील दोन ठेकेदारांच्या काळेवाडी फाटा येथील पार्क स्ट्रीटमधील घरी तसेच मूलचंदानीच्या बहिणीच्या जावयाच्या औंधमधील उच्चभ्रू सिंध सोसायटी परिसरातील घरीही ईडीने छापेमारी केली.

स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त यावेळी मदतीसाठी घेण्यात आला होता. सेवा विकास बँक फसवणूक प्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक आणि सुटका झाली आहे. विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. मध्यंतरी शहर पोलिसांनी यातील एका गुन्ह्यात तक्रारदाराने गैरसमजातून फिर्याद दिल्याचा अहवाल कोर्टात दाखल केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सेवा विकास बँक फसवणूक प्रकरणात यापूर्वी ईडीने मूलचंदानीशिवाय

एका शाळा चालक आणि पिंपरीतील एका वकिलाच्या घरावर छापेमारी केली होती. त्यानंतर आता पुन्हा नातेवाईक, मित्र, सहकारी यांच्या घरावर छापेमारी सुरू असल्याने या प्रकरणातील इतर अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील अनेक राजकीय व्यक्ती या बँकेशी संबंधित असल्याने भविष्यात छापेमारीमध्ये या लोकांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. आम्ही कोणाची फसवणूक केली नसल्याचा दावा बॅंकेच्या तत्कालीन संचालकांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे अद्यापही अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचा पैसा अडकून पडलेला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story